संग्रहित छायाचित्र
मंचर: दत्तात्रय वळसे पाटील (Dattatraya Walse Patil) यांनी माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आंबेगाव तालुक्याने दत्तात्रय वळसे पाटीलसारखे नेते दिले. त्यांच्या वारसदारांना (दिलीप वळसे पाटील) आम्ही खूप काही दिलं. विधानसभेचे अध्यक्षपद दिले. मंत्रिपदं दिलं, देशाच्या साखर उद्योगाचे अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थांवर काम करण्याची संधी दिली. एवढं दिल्यानंतरही दत्तात्रय पाटील यांच्या ठायी जी निष्ठा होती, त्यातील पाच टक्के निष्ठासुद्धा दिलीप वळसे पाटील यांच्यात नाही, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी बुधवारी आंबेगावमधील मंचर येथे घेतलेल्या सभेत केली. दिलीप वळसे पाटील यांच्यावर आरोप करताना पवार म्हटले की, जर हे लोक आम्हा लोकांबरोबर निष्ठा ठेवत नसतील तर उद्या निवडून दिल्यानंतर जनतेशीही निष्ठा ठेवणार नाहीत, एवढंच मला सांगायचे आहे. हे चित्र बदलायचे असेल तर तुम्हा सर्वांना जागं राहावे लागेल. (Dilip Walse Patil)
कोल्हेंसारख्या नेत्याची निवड करा
डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्यासारखा खासदार येथल्या जनतेने निवडून दिला. लोकसभेत ते बोलायला लागल्यानंतर इतर खासदार अतिशय शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. कोल्हेंसारख्या निष्ठावान लोकांची आज गरज आहे. सामान्य माणसाला जागं करून जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या नेत्यांची निवड करा, असे आवाहनही शरद पवार यांनी केले. शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी असलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाबरोबर गेल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. आज शरद पवार गटाकडून दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव या मतदारसंघातील मंचर येथे जाहिर सभा घेण्यात आली. या सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. दिलीप वळसे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी आणि आता शरद पवार गटात असलेल्या देवदत्त निकम यांनी दिलीप वळसे पाटील यांची जुनी विधाने मोठ्या पडद्यावर दाखवली.
...तेच नामुमकिन-शरद पवार
अजूनही नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकसभा विजयाची पूर्णपणे खात्री नाही. भाजपच्या विरोधात निकाल राहील असा निष्कर्ष अनेक सर्वेक्षणातून सांगितला जात आहे. महाविकास आघाडीला राज्यात ५० टक्के जागा मिळत आहेत. अशा परिस्थितीत भाजपला काहीही करुन राज्य अस्थिर करायचे असल्याने भाजप ईडी, सीबीआयचा वापर करीत आहे. मोदी है तो मुमकिन है असे भाजपचे कार्यकर्ते सांगत असले तरी तेच नामुमकिन असल्याचे आम्हाला दिसत आहे, असल्याचे मत शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी कोल्हापूर येथे व्यक्त केले.
पवार यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका व्यक्त केली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच एका सभेमध्ये विरोधकांवर निशाणा साधताना शरद पवार यांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचे असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी सुप्रिया सुळे या लोकसभेमध्ये काम पाहतात. संसदेत काम करतात हे अमित शहा यांना माहीत असले पाहिजे. भाजपमध्ये एका कुटुंबात दोन पदे किती आहेत याची मी यादी देतो, असा पलटवार पवार यांनी केला.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणे हे इतरांसाठी आश्चर्यकारक असले तरी मला मात्र त्यात काहीच आश्चर्य वाटत नाही, असा उल्लेख करून पवार म्हणाले, भाजपने गेल्या १० वर्षांतील त्यांची कामगिरी आणि विरोधकांबद्दलची श्वेतपत्रिका काढली होती. त्यामध्ये अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. तेव्हाच चव्हाण यांना ही एकप्रकारे दिलेली धमकी आहे हे आम्हाला दिसून आले. या गोष्टीचे काहीतरी परिणाम होतील, असे वाटले होते. तेच पुढे घडले.
या नेत्यांना बाजूला करणार
रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामुळे शरद पवार यांची साथ सोडली, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. त्यामुळे रोहित पवार आज काय बोलतात, याकडेही अनेकांचे लक्ष होते. रोहित पवार म्हणाले की, एकदा लोकसभा निवडणूक आटोपली की या लोकांना भाजपा विचारणारही नाही. त्यांना विधानसभेला भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. मागच्या काही काळापासून कांदा निर्यातीवर बंदी आणली गेली. निर्यातीवरील बंदी उठविण्यासाठी त्यांनी एकही पत्र लिहिले नाही. फक्त सरकारमध्ये जाऊन बसण्याने तुमचा विकास होत असेल पण, जनतेच्या विकासाचे काय? असा सवाल उपस्थित करून रोहित पवारांनी जोरदार टीका केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.