संग्रहित छायाचित्र
बुलढाणा: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्यभर दौऱ्यांना सुरुवात केली आहे. त्या निमित्ताने ते गुरुवारी बुलढाण्यात होते. जनतेशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध नव्हता, त्यांच्या पदरात पुन्हा भारतमाता टाकणार का? ते जर टाकायचे नसेल तर इथून फक्त आपल्या शिवसेनेलाच मतदान करा. त्यांची शिवेसना मी मानत नाही. कोणीतरी माझ्या आजोबांनी पक्षाला दिलेले नाव त्यांना देत असेल तर ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचे नावच बदलतो. धोंड्या आजपासून तो. ही आमची शिवसेना (Shivsena) आणि ही आमचीच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. (Uddhav Thackeray in Buldhana)
ते म्हणाले, “महाराष्ट्राची जिद्द गेली कुठे? बुलढाणा आपण म्हणतो की सिंदखेड राजा म्हणजे जिजाऊंचे जन्मस्थान. जिजाऊंनी आपल्याला एवढे मोठे दैवत दिले, त्यांना आपण विसरलो. अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द ज्या दैवताने दिली त्यांचे मातृस्थान या जिल्ह्यात आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येला वळत असेल आणि गद्दार टिमकी वाजवत असेल तर बुलढणाकरांना तरी जिजाऊंचे नाव घेण्याची योग्यता नाही. भाजपवाले जे म्हणताय की ते घराणेशाहीच्या विरुद्ध आहेत, पण आम्ही तुमच्या एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीच्याविरोधात आहोत. मुख्यमंत्री पद म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्षपद नाही की तुम्ही जसे तिथे जय शाहाला बसवले. माझे घराणे अगदी प्रबोधनकारांपासून महाराष्ट्रासमोर आहे. अमित शाह, तुमचे असे क्रिकेटमधले काय योगदान आहे? जय शाह विराट कोहलीचा प्रशिक्षक होता का? मुंबईमधील मॅच अहमदाबादला नेणे एवढेच त्याचे कर्तृत्व, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
अशोक चव्हाण, अजित पवार तिथे गेले. जुने काँग्रेसवाले पुन्हा हवे असतील तर भाजपाला मतदान करा, अशी काही टॅगलाईन आहे की काय. भाजपाला मतदान करा, जुने काँग्रेसवाले आमदार-खासदार करा. हा प्रश्न तुम्हाला सर्वांना विचारतो, ही लढाई माझ्या एकट्याची नाही. तुमच्या पुढच्या पिढ्या लोकशाहीत राहावीत असे वाटते की हुकुमशाहीत जगावी असे वाटते त्याला मतदान करा, असेही ठाकरे म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.