संग्रहित छायाचित्र
चंद्रपूर: लोकसभेची निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला असून चंद्रपूरच्या राजकारणानेही आता नवे वळण घेतले आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यावर आजअखेर मौन साधणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षाने संधी दिल्यास लोकसभा लढविण्याची आपली तयारी असल्याचे सांगत अनेकांना धक्का दिला आहे. वडेट्टीवार ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित मानला जातो. कन्या शिवानीला येथून विधानसभेसाठी उभे करायचे आणि आपण लोकसभा लढवायची असा वडेट्टीवार यांचा विचार असल्याचे दिसते. शिवानी अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. भाजपच्या हंसराज अहिर यांनी या गडाला सुरुंग लावला. तब्बल चार वेळा अहिर मतदारसंघातून निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी त्यांच्यावर विजय मिळविला. हा पराभव अहिर आणि भाजप पक्षश्रेष्ठींच्या चांगलाच जिव्हारी लागला. खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार, याकडे अनेकांचे लक्ष आहे. दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे अर्जही दाखल केला आहे.
अशात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असल्याचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. पक्षाने जर आपणास संधी दिली तर आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाची उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो आपणास मान्य असेल, असेही ते म्हणाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात काँग्रेसला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे बाळू धानोरकर यांच्या विजयात वडेट्टीवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. हा मतदारसंघ त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित मानला जातो. त्यांची कन्या शिवानी अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. अलीकडे ब्रह्मपुरी मतदारसंघात त्या सातत्याने काम करताना दिसत आहेत. अशा वेळी शिवानी यांच्याकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवून विजय वडेट्टीवार हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीत चारशे जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. मागील निवडणुकीत चंद्रपूरची जागा हातून गेल्याने पक्षश्रेष्ठींनी हा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. यासाठी एका नव्या ओबीसी चेहऱ्याची शोधाशोध त्यांनी सुरू केली आहे. अशात वडेट्टीवार यांची उमेदवारी भाजपसाठी मोठे आव्हान ठरू शकते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.