सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा, आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान

दक्षिण सोलापूर तालुक्याचा भाजप मेळावा शांतीसागर मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी बोलताना आमदार सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य बनविले

संग्रहित छायाचित्र

एवढी मोठ-मोठी पदे भूषवली, सोलापूरसाठी काय केले?

सोलापूर: मागील दहा वर्षांत सोलापुरात भाजपच्या दोन्ही खासदारांनी भरीव विकास केला आहे. विकासकामांची माहिती देताना दिवससुध्दा कमी पडेल, असा दावा करीत सोलापूर लोकसभा (Solapur Lok Sabha) निवडणुकीतील भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी, आम्ही मागील दहा वर्षांचा विकासकामांचा हिशेब तयार आहे, सत्तेच्या खुर्च्या उबविणाऱ्या तुमच्या ज्येष्ठ नेत्यांनी ७५ वर्षांत सोलापूरसाठी काय केले हे सांगावे, असे आव्हान दिले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्याचा भाजप मेळावा शांतीसागर मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी बोलताना आमदार सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य बनविले. सोलापूर शहराभोवती उभारलेला बाह्यवळण रस्ता, आसपासच्या छोट्या-मोठ्या शहरांना जोडलेले चौपदरी रस्ते, गरीब कामगारांसाठी ३० हजार घरे, शेतक-यांना वार्षिक सहा हजार पेन्शन, अडीच लाख तरुणांना मुद्रा लोनच्या माध्यमातून १७०० कोटींचे कर्ज, उज्ज्वला गॅस अशी एक ना अनेक विकास कामे सोलापूरच्या या पूर्वीच्या दोन्ही भाजप खासदारांनी केली आहेत. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव आपल्याच सरकारने दिले आहे. अशी किमान २५० विकास कामे भाजपने केल्याचे सांगताना दिवसदेखील पुरणार नाही, असा दावा आमदार सातपुते यांनी केला. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या नेतृत्वावर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. यापूर्वी ७०-७५ वर्षे काँग्रेसची सत्ता असताना आणि सोलापूरचे नेतृत्व करताना सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक सत्तापदे सांभाळली तरी त्यांनी सोलापूरचा कोणता विकास केला, याचा हिशेब देण्याचे आव्हान सातपुते यांनी दिले.

भाजप समर्थकांकडून चारित्र्यहनन होण्याची शक्यता- प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने आपल्या विरोधात आणि कुटुंबीयांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन खोटे आरोप होत आहेत. येणाऱ्या ३०-३५ दिवसांच्या प्रचार काळात आपले चारित्र्यहनन होण्याचीही भीती वाटत असल्याचे काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी म्हटले आहे.

निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना काँग्रेस व भाजपकडून एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपकडून आपल्या विरोधात खोटा आणि हिणकस प्रचार केला असल्याचा आरोप केला आहे. विशेषतः समाज माध्यमांतून पातळी सोडून प्रचार केला जात आहे. विशेषतः आपले वडील सुशीलकुमार शिंंदे यांच्यावर बेछूट आणि निराधार आरोप वारंवार करून ते खरे असल्याचे जनतेच्या मनावर बिंबविण्याची हिटलरी पद्धत अवलंबविली जात असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, मी स्वतः उमेदवार असताना माझ्यावर टीका करण्यापेक्षा किंवा मला थेट भिडण्यापेक्षा वडील सुशीलकुमार शिंदे यांना धादांत खोट्या आरोपांच्या माध्यमातून टीकेचे लक्ष्य बनविले जात आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचा विकास करण्याऐवजी दक्षिण आफ्रिकेत स्वतःचे चहाचे मळे उभारले आहेत, इथपर्यंत खोटे आरोप केले जात आहेत. भाजपच्या हाती मागील दहा वर्षांपासून सत्ता असताना आमच्या कुटुंबीयांची चौकशी करायला हवी होती. ती का केली नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest