संग्रहित छायाचित्र
काँग्रेसचे माजी प्रांताध्यक्ष दिवंगत प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज भोसले यांनी पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच यावेळी त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. भोसले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत वाई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मदन भोसले यांचे यशराज भोसले हे पुतणे आहेत.
वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शरद पवार गटाकडून मकरंद पाटील यांच्याविरोधात त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आमदार आणि भाजप नेते मदन भोसले गटाशी संपर्क सुरू झाला आहे. त्याचा एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच मदन भोसले यांची साताऱ्यात भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर यशराज भोसले यांच्या पवार भेटीला महत्त्व दिले जात आहे. भेटीनंतर यशराज भोसले म्हणाले, की प्रतापराव भोसले यांचे शरद पवारांशी पूर्वापार राजकीय वैर होते. मात्र, अखेरच्या काळात राजकारणात काम करायचे असेल, तर शरद पवार यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे भेट घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पक्ष सदस्यत्व स्वीकारले.
यशराज भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा पगडा असून, त्यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या विचारांचा भोसले घराणे आदर करीत असून, प्रतापराव भोसले यांनी राजकारण करावयाचे झाल्यास शरद पवार यांच्या बरोबर जाणे योग्य असल्याचे सांगितले होते. शरद पवारांनी अन्य कोणालाही उमेदवारी दिल्यास त्यांचे काम करणार असून, त्यासाठी डॉ. नितीन सावंत, ॲड. विजयसिंह पिसाळ, अनिल जगताप यांच्याशी योग्य समन्वय साधणार आहे. विकासाच्या नुसत्या गप्पा मारणाऱ्यांना यावेळी मतदार घरी बसवणार आहे. त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत दिसून आल्याने शशिकांत शिंदे यांना वाईमध्ये मताधिक्य मिळाले. यामुळे वाईत विधानसबेला तुतारीच वाजणार हे नक्की.
दरम्यान, जयंत पाटील यांनी नुकतीच भाजप नेते आणि माजी आमदार मदन भोसले यांची साताऱ्यात भेट घेतली होती. या भेटीनंतर भोसले यांनी कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी वाईमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये तुतारीला साथ देण्याचे संकेत मिळाले. तसेच मदन भोसलेंनी योग्य भूमिका घ्यावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.