ईडी, सीबीआयच्या गैरवापराने भाजपकडून राजकीय अस्वस्थता - काँग्रेस प्रवक्ते‌ अतुल लोंढे

ईडी, सीबीआय या संस्थांचा अमर्याद गैरवापर करून राज्यपालांच्या मदतीने विविध राज्यांत राजकीय अस्वस्थता निर्माण केली जात आहे. आपल्या देशाचे संविधान बदलण्याची भाषा भाजपचे नेते करत आहेत.

ईडी, सीबीआयच्या गैरवापराने भाजपकडून राजकीय अस्वस्थता - काँग्रेस प्रवक्ते‌ अतुल लोंढे

भाजप घटनेची मोडतोड करत असल्याचा काँग्रेस प्रवक्ते‌ अतुल लोंढे यांचा आरोप

ईडी, सीबीआय या संस्थांचा अमर्याद गैरवापर करून राज्यपालांच्या मदतीने विविध राज्यांत  राजकीय अस्वस्थता निर्माण केली जात आहे. आपल्या देशाचे संविधान बदलण्याची भाषा भाजपचे नेते करत आहेत. भाजपकडून संविधानाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते‌ अतुल लोंढे यांनी सोमवारी केला.

पुणे लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लोंढे बोलत होते. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष व निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी,  ॲड अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, गोपाल तिवारी आदी उपस्थित होते.

लोंढे म्हणाले,  देशासाठी पदक जिंकणाऱ्या महिला कुस्तीपटूंवर  अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषणसिंग‌ यांचा सत्कार मुरलीधर मोहोळ यांनी केला. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीशी ते उभे राहिले. मोहोळ यांना महापालिकेचे‌ स्थायी‌ समिती अध्यक्षपद मिळाले, महापौरपद मिळाले. या काळात त्यांनी पुणेकरांसाठी काहीच केले नाही. त्यांच्या‌ काळातील समान पाणीपुरवठा योजनेचे काय झाले ? महिलांच्या सॅनेटरी नॅपकीनलाही ठेकेदार मिळाला नाही. महापालिकेचा कारभार करताना पुणेकरांना सेवा-सुविधा देण्यास भाजप आणि मोहोळ अपयशी ठरले आहेत. देशात दहा वर्षात काहीही न केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दाखवण्यासारखे काहीच नाही. आमचे उमेदवार रवींद्र धंगेकर सर्वसामान्य जनतेशी जोडलेले आहेत. ते लोकांच्या हाकेला धावून जातात. त्यामुळे ते नक्की मोहोळ यांचा पराभव करतील.  देशामध्ये काँग्रेसची लाट असून पहिल्या टप्प्यात भापजचा पराभव दिसू लागला आहे. राज्यातील निवडणुका झालेल्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकणार असून नितीन गडकरी हेदेखील पराभूत होतील. आमच्याकडे कार्यक्रम आहे, नीती आणि नियत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील, तेवढ्या जास्त‌ जागा इंडिया आघाडी जिंकेल, असा विश्वासही लोंढे यांनी व्यक्त केला.

लोंढे म्हणाले, पंतप्रधानांच्या‌ समोर मुनगंटीवार बहीण भावाबद्दल बोलले, ही त्यांची‌ संस्कृती आहे का ? आमच्या नेत्यांच्या सभांना चांगला‌ प्रतिसाद मिळत आहे. आम्ही दिलेली आश्वासने पाळली, त्याचे उदाहरण कर्नाटक आहे. मोदींनी दिलेली आश्वासने पाळली का ? काहीही पाळले नाही. उलट वेदांत फॉक्सकॉन हा एक लाख रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प गुजरातला पळवला. तरीही राज्यातील सत्तेतील एक फूल दोन हाफ नेते गप्प बसले. फडणवीस हे फौजदारचे हवालदार झाले आहेत. अजितदादा यांच्या वाट्याला चार जागा आल्या, त्याही ते हरत आहेत. राज्यात गद्दारी विरुद्ध खुद्दारी अशी लढत आहे. मतदान कमी का झाले याचा विचार भाजपने करावा. ही लढाई लोकशाही व संविधान वाचवण्याची आहे, त्यामुळे जनता काँग्रेस व आघाडीच्या उमेदवारांना निवडून देईल.

... म्हणून ५ टप्प्यांत मतदान 

 काही समाजाची मते डिलिट करण्यात आली आहेत. उमेदवाराला यादी दिल्यानंतर नावे काढण्यात आली आहे. विदर्भात एका एका केंद्रावर १०० मते कमी आहेत. त्यामुळे आम्ही नागपूर, चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे सांगून लोंढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षात‌ील  कारभारावर लोक नाराज आहेत. शिवाय राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यास‌ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आले आहे. या दोन गोष्टींचा विचार करून राज्यात लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात घेतल्या जात आहेत. मोदी फेल आहेत, फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी आहे, हे मात्र नक्की.

बंडखोरांवर कारवाई 

 राज्यात महाविकास आघाडी भक्कम असून जागा वाटप अंतिम झाले आहे. असे असतानाही पक्षाच्या निर्णयाविरोधात बोलणारे आणि कृती‌ करणारे कोणीही असोत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असे म्हणत लोंढे यांनी सांगलीचे विशाल पाटील व पुण्याचे आबा बागूल यांच्यावर कारवाई होऊ शकेल असे स्पष्ट केले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest