पक्ष फोडला, चिन्ह चोरले, तरी सुज्ञ जनता उद्धव ठाकरेंबरोबर: माणिकराव ठाकरे यांचा दावा

धर्माच्या, जातीच्या नावाने लोकांना फसवले जात आहे. देशात इंडिया आघाडी सत्तेवर आणण्याचे जनतेने ठरवले आहे. सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, चिन्ह चोरले हे भाजपने घडवून आणले.

संग्रहित छायाचित्र

विदर्भाच्या पाच जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा विश्वास

धर्माच्या, जातीच्या नावाने लोकांना फसवले जात आहे. देशात इंडिया आघाडी सत्तेवर आणण्याचे जनतेने ठरवले आहे. सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, चिन्ह चोरले हे भाजपने घडवून आणले. परंतु जनता सुज्ञ असून ती ठाकरेंबरोबर आहे, असे मत काॅग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे (Manikrao Thakare) यांनी व्यक्त केले.

मावळ लोकसभेचे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी आज मंगळवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आकुर्डीतील सभेत ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शेकापचे बाळाराम पाटील, शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन अहिर, मावळचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीतील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष व इतर संघटनाचे पदाधिकारी‌ व‌ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माणिकराव ठाकरे म्हणाले, ‘‘पहिल्या फेरीत विदर्भाच्या पाच जगामध्ये हवा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. पाचही जागा आम्ही जिंकणार आहोत. देशात ज्या पद्धतीने राजकारण भाजपने केले. त्यामुळे जनता खूपच नाराज आहे. शेतकरी, युवक, गृहिणी सगळे नाराज आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बदलाचे वातारण आहे.’’

आमदार रोहित पवार म्हणाले की, ‘‘मावळच्या भूमीने कायम स्वाभिमान राखला. तोच या निवडणुकीत राखणार आहेत. गद्दारांना धडा शिकविण्यासाठी आणि भाजपला जागा दाखविणारी ही लढाई आहे. कोणी काही सोयीचे राजकारण केले, तरी आपण निष्ठा सोडणार नाही‌. भाजपने २०१४ नंतर कंपन्या आणल्या नाहीत. पण, हक्काचा उद्योग गुजरातमध्ये गेला. इथल्या खासदारांनी काय केले?’’ एकजुटीने आपलं ठरलंय, संजोग वाघेरे यांना खासदार करायचंय, असा नारा देत शहरातून तीन लाखांचे मताधिक्य द्या, असे आवाहन रोहित पवारांनी केले.

शिवसैनिक निखा-यासारखा असतो. तो पेटून उठला, तर‌ तो विझत नाही. आदिलशाहीला न जुमानता वतनावर पाणी सोडून कान्होजीराजे जैधे स्वराज्यासोबत राहिले. म्हणून त्यांच्या निष्ठेचा इतिहास सांगितला जातो. हनुमानाने शेपटीची मशाल करून रावणाची लंका दहन करण्याचे काम केले. जो कोणी देशाला मातृभूमी मानतो. त्या सर्वांची ही निवडणूक आहे. या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून गद्दारी गाडण्यासाठी मावळ लोकसभेत मशाल पेटवा, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest