संग्रहित
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळं राज्यात राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. अशातच काल या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्यात आला. त्यामुळं राज्यात चांगलीच खळबळ माजली. दरम्यान, या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना धक्का देत राष्ट्रवादीची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे. अजितदादांच्या या भूमिकेमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी असलेला विष्णू चाटे हा राष्ट्रवादी पक्षाचा तालुकाध्यक्ष होता तर या प्रकरणाचा संशयित मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्यात खास संबध असल्याचे अनेक पुरावे सादर होत आहे. या सर्व घडामोडी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. तसेच तालुक्याची जी कार्यकारिणी होती, तीदेखील बरखास्त करण्यात आली आहे.
विष्णू चाटे हे केजचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष होते, मात्र देशमुख हत्याप्रकरणी गुन्ह्यात त्याचं नाव आल्यानंतर त्यांना तातडीने निलंबित करण्यात आलं होते. तसेच, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक लोकांची चौकशीसुद्धा करण्यात आली. त्यानंतर सुनील तटकरे यांनी महत्वाचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलं आहे. तसेच यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत.