संग्रहित छायाचित्र
शिर्डीत भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. भाजपाचे अनेक नेते शिर्डीत उपस्थित राहून त्यांची मते आणि विचार मांडत आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे हे पहिलेच मोठे अधिवेशन आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनीही या अधिवेशनात खुमासदार भाषण केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर खरपूस टीकाही केली.
शेलार म्हणाले, शरद पवारांनी काही भाट पाळलेले आहेत. भाजप ६० जागांच्या पुढे जाणार नाही, असे हे भाट सांगत होते. एक गोष्ट सांगून पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाचा सल्ला घेणाऱ्या सरदारासारखी झाली असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
राज्यातील शेतकऱ्यांना दुर्लक्षित केल्यानंतर मोठे बंड उभे राहील, असे शरद पवार म्हणत होते. संविधान बदलेल, आरक्षण जाईल, तीन राज्यांत भाजप जिंकली तरी, महाराष्ट्रात पराभव होईल. शरद पवारांच्या पक्षाने कुणा-कुणाची मदत घेतली नाही? मित्र पक्ष म्हणून महाविकास आघाडी होतीच, पण काही भाट पण त्यांनी पाळले. भाजप ६० जागांच्या पुढे जाणारच नाही, असे त्या भाटांनी सांगितले होते. मडके विकणाऱ्या व्यापाऱ्यासह जो मिळेल, त्याला शरद पवारांच्या पक्षाने सल्लागार बनवले होते. आता पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाचा सल्ला घेणाऱ्या सरदारासारखी झाली. ही अवस्था महाराष्ट्राच्या जनतेने केली, असे आशिष शेलार म्हणाले.