Ajit Pawar big statement on dhananjay munde
चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं...असं मोठं वक्तव्य मुंडेंची पाठराखण करणाऱ्या अजितदादांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे त्यांचा राजीनामा लवकरच अजितदादांकडे सुपूर्द करतील अशी चर्चांना उधाण आलं आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी संशयित मुख्य आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावत त्याच्यावर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे याप्रकरणी विरोधकांसह अनेक सत्ताधारी नेत्यांकडून मुंडेंची मंत्रीपदावरुन हाकलपट्टी करण्यात यावी या मागणीने जोर धरला आहे. अशातच, माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मुंडेंच्या राजीनाम्यावर स्पष्ट भूमिका व्यक्त केली. आत्तापर्यंत पाठराखण करत आलेल्या अजितदादांनी मुंडेंना चांगलाच धक्का दिला.
नेमक अजितदादा काय म्हणाले?
वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आल्यानंतर माध्यमांनी अजित पवारांना घेरले. यावेळी त्यांनी पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना अजित पवारांनी स्पष्ट भुमिका मांडली. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार...कुणाकडे काही पुरावे असतील त्यांनी आम्हाला द्यावे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, मी पण शेतकरी आहे. शेतकरी म्हणूनच बोलतोय. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते. आम्ही चौकशी कर...कोणालाही पाठीशी घालणार नाही, अस पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात आहे. केज सत्र न्यायालयातील वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज वाल्मिक कराडला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंयत आठ आरोपींवर मकोका गुन्हा दाखल आहे.