Maharashtra Congress
विधानसभा निवडणुकीतील हाराकिरीनंतर काँग्रेसच्या महाराष्ट्र संघटनेत शेंड्यापासून बुडापर्यंत बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकरणी काँग्रेस नेतृत्वाने नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी एका नव्या सर्वमान्य चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव अग्रस्थानी आहे. याशिवाय पक्षाचे तरुण नेते सतेज पाटील, अमित देशमुख यांच्यासह यशोमती ठाकूर यांचेही नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. त्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची पूर्णतः वाताहत झाली. काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 16 जागा आल्या. यामुळे धक्का बसलेल्या काँग्रेसने आता आपल्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल करण्याचे संकेत दिलेत. या अंतर्गत सर्वप्रथम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी एखाद्या नव्या चेहऱ्याची नियुक्ती केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेस हायकमांडकडून प्रदेशाध्य पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या दिशेने रवाना रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ 16 च जागा जिंकता आल्या, त्यानंतर आता काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. त्यांना हायकमांडकडून तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलं आहे, ते दिल्लीला रवाना देखील झाले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष बनवण्याची शक्यता आहे.
याशिवाय सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार व यशोमती ठाकूर या नेत्यांची नावेही या प्रकरणी चर्चेत आहेत. यात यशोमती ठाकूर यांच्या नावावरही गांभिर्याने चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. ठाकूर यांची या पदावर निवड झाली तर अनेक वर्षांनी महाराष्ट्र काँग्रेसला एखाद्या महिलेचा चेहरा मिळेल.
विजय वडेट्टीवार व सतेज पाटील हे ही काँग्रेसमध्ये आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सतेज पाटील हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. याशिवाय विश्वजीत कदम व अमित देशमुख यांच्याकडेही पक्षाचे तरूण नेते म्हणून पाहिले जाते. अमित देशमुख हे काँग्रेसचे दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. तर विश्वजीत कदम हे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहे. या दोघेही पक्षाचे नव्या दमाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आता काँग्रेस यापैकी कुणाकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.