संग्रहित
एकिकडे राजकीय वर्तुळात राष्ट्रदावीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले तर दुसरीकडे शरद पवारांची सध्याची बदलती भूमिका पाहता राजकीय गोटात पवारांच्या मनात नेमकं काय सुरुय? अशा प्रश्नांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केलं. तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक प्रश्नांसंदर्भात पवार थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करुन चर्चा करताना दिसत आहे. राज्यातील या बदलत्या राजकीय चित्रामुळं भाजप-शरद पवारांच्या जवळीक वाढली असल्याचे तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
दोन दिवसापूर्वी झालेल्या एका बैठकीमध्ये शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. त्यांनी त्यांच्या भाषणात संघाच्या कामकाजाबाबत गौरवोद्गार काढले. त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फोनवरुन सुमारे 15 मिनिटं चर्चा केली असल्याचे समजते.
शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बीड आणि परभणी येथील परिस्थितीवर चर्चा झाली. हा भाग शांत झाली पाहिजे. आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच, बीड, परभणी कस शांत करता येईल, हे पहिले पाहिजे. मी इथे येण्याआधी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. अशांत महाराष्ट्र असे चित्र राज्यात होवू द्यायचे नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
शरद पवारांची ही बदलेली भूमिका पाहता राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल उपस्थित केला. यावर बोलताना, शरद पवार हे अतिशय चाणाक्ष नेते आहेत. त्यांनी निश्चितच अभ्यास केला असेल की, त्यांनी लोकसभेच्या वेळी एवढे मोठे वायू मंडळ तयार केले होते. परंतु, ते एका मिनिटात पंक्चर कसे काय झाले? ते वायूमंडळ पंक्चर करणारी शक्ती कोण आहे? त्यांच्या लक्षात आले की, ही शक्ती नियमित राजकारण करणारी शक्ती नाही. तर राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. शेवटी कधीतरी प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करावे लागते, त्या हिशोबाने त्यांनी संघाचे कौतुक केले असेल, असे मला वाटते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.