बारामतीत दादा-ताई एकाच कार्यक्रमात, पण संवाद नाही
बारामती – लोकसभा निवडणुकीनंतर बारामती परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकत्र व्यासपीठावर दिसले नव्हते. मात्र, अंजनगाव येथील वीज वितरण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात हे दोघे आमनेसामने आले.
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका ऐनवेळी मिळाल्याने सुप्रिया सुळे नाराज होत्या. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. तरीही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अंजनगावला पोहोचल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आधीच त्या कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या आणि त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करत थांबल्या. त्यानंतर हा उद्घाटन सोहळा दोघांच्या उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच बारामतीत एका कार्यक्रमात एकत्र दिसले.
मात्र, कार्यक्रम संपेपर्यंत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात कोणताही संवाद झाला नसल्याचे सांगितले जात आहे. उद्घाटनानंतर खासदार सुळे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान दोघांनीही एकमेकांशी बोलणे टाळल्याचे दिसून आले.