संग्रहित छायाचित्र
मुंबई: राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि सत्तारूढ शिवसेना (शिंदे गट) आमदार शुक्रवारी विधिमंडळ आवारात परस्परांना भिडले. विधिमंडळाचा शेवटचा दिवस असताना घडलेल्या या धक्कादायक घटनेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) हे दोघे एकाच पक्षाचे असून त्यांच्यातील कथित धक्काबुक्कीवेळी भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली. (Political News)
याबाबत महेंद्र थोरवे म्हणाले, आम्ही प्रामाणिकपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. माझं दादा भुसे यांच्याशी खात्याशी संबधित काम आहे, त्याबाबत मी त्यांना माझ्या मतदारसंघातील काम का होत नाही, असे विचारले. यावेळी त्यांचा आवाज वाढला. आम्ही देखील आमदार आहोत. त्यांना आम्ही मंत्री केलं आहे. ते जाणीवपूर्वक काम करत नसल्याचा आरोप थोरवे यांनी केला.
आमदारांची कामे होत नाहीत. कामे होत नसतील तर काय करणार, असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. दादा भुसे ॲरोगंट आहेत, आमच्यामुळे ते मंत्री झाले, मी त्यांच्या घरचं खात नाही, असे म्हणत थोरवेंनी भुसेंवर हल्लाबोल केला.
थोरवे पुढे म्हणाले, 'मंत्री दादा भुसे यांना मुख्यमंत्र्यांनीसुद्धा कॉल करून सांगितले होतं. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही कॉल करून सांगितलं, काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी जाणीवपूर्वक काम टाळले. आज मी त्यांना विचारलं की, दादा बाकीच्या लोकांची कामे काल तुम्ही मीटिंगमध्ये घेतली आणि माझे काम मुख्यमंत्र्यांनीसांगूनसुद्धा झाले नाही. अशी विचारणा केल्यावर ते माझ्यासमोर चिडून बोलले. आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत.
आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे केली पाहिजेत, अशा पद्धतीने ॲरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही स्वाभिमान विकणार नाही. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे, ते जनतेचे काम आहे. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, मी तुमच्या घरचं खात नाही. माझे काम झालं पाहिजे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही करायला पाहिजे. महेंद्र थोरवे ४६ वर्षांचे असून ते २०१९ मध्ये कर्जत येथून विजयी झाले. सध्या ते शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून तिकीट मागितलं होतं.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.