मावळात घाटाखाली सर्वाधिक मतदान; पिंपरीतील टक्केवारी केवळ ५० टक्क्यांवर

मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सहा विधानसभा क्षेत्रात सोमवारी (१३ मे) मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, कर्जत येथील एका केंद्रावर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतदानामुळे एकूण टक्केवारी प्राप्त होण्यास उशीर झाला. मावळात एकूण ५४.८७ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले.

मावळात घाटाखाली सर्वाधिक मतदान

कर्जत आणि उरण या दोन्ही ठिकाणी ६० टक्क्याहून मतदान, पनवेलमध्येही टक्का घसरला

पंकज खोले - 

मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सहा विधानसभा क्षेत्रात सोमवारी (१३ मे) मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, कर्जत येथील एका केंद्रावर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतदानामुळे एकूण टक्केवारी प्राप्त होण्यास उशीर झाला. मावळात एकूण ५४.८७ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले. ते गतवर्षीच्या मतदानापेक्षा जवळपास ५ टक्क्यांनी घसरले. 

चिंचवडनंतर पनवेलमध्ये सर्वाधिक मतदान असूनही या ठिकाणी मतदारांनी मतदान करण्यात उत्साह दाखवला नाही. त्याचा फटका दोन्हीही प्रबळ उमेदवाराला बसणार आहे. तर, कर्जत आणि उरण या दोन्ही ठिकाणी ६० टक्क्याहून मतदान झाले आहे.

चिंचवड आणि पनवेल या दोन ठिकाणी जवळपास सहा लाखांच्या आसपास मतदान होते. त्यामुळे या दोन्ही विधानसभेवर नेमके किती मतदान होईल, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. मात्र, पनवेलमध्ये ५ लाख ९१ हजार ३९८ मतदारांपैकी केवळ २ लाख ९५ हजार ९७३ जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी मतदान जास्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, तसे झाले नाही. त्याचप्रमाणे चिंचवड येथे देखील ६ लाख १८ हजार २४५ मतदारांपैकी ३ लाख २२ हजार ७०० मतदारांनी हक्क बजावला. त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या मतदानाची बेरजेचे गणित चुकणार आहे. त्याचा फटका उमेदवाराला बसणार आहे. या दोन्ही ठिकाणी जेमतेम ५० टक्के मतदान झाले आहे.

त्या पाठोपाठ कर्जत आणि उरण या दोन्ही ठिकाणी मतदान सर्वाधिक झाल्याची नोंद आहे. कर्जत या ठिकाणी ३ लाख ९ हजार २०८ मतदार होते. त्यापैकी १ लाख ८९ हजार ८५३ जणांनी मतदान केले. येथील टक्केवारी ६१ आहे. तर, उरण या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे ६७ टक्के मतदान झाले आहे . या ठिकाणी ३ लाख १९ हजार ३११ मतदारांपैकी २ लाख १४ हजार १६९ मतदान झाले. या दोन्ही ठिकाणी सर्वाधिक मतदान झाल्याने याचा नेमका फायदा कोणता उमेदवार झाला हे सांगणे कठीण आहे. मात्र, तूर्तास दोन्ही उमेदवार या ठिकाणांच्या मतदानाच्या गणिताचा आधार घेत आहेत. त्या पाठोपाठ मावळातही ५५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. मावळ विधानसभेमध्ये २ लाख ६ हजार ९४९ मतदान झाले. येथील एकूण मतदान हे ३ लाख ७३ हजार ४०८ इतके होते.

पिंपरी विधानसभा क्षेत्रामध्ये देखील मतदारांनी निरुत्साह दाखवला. या ठिकाणी ३ लाख ३७ हजार ४४८ मतदानापैकी केवळ १ लाख ८८ हजार ७९५ मतदान झाले. हे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास होते. त्यामुळे पिंपरीतील मतदान करणारा मोठा वर्ग बाहेर आला नाही. व्यावसायिक आणि मार्केट म्हणून पिंपरीकडे पाहिले जाते. मात्र, या ठिकाणच्या मतदारांनी निराशा दाखवली.

महिलांचा उत्साह सर्वाधिक

मावळ मतदारसंघात एकूण मतदारांपैकी महिला वर्गाचा मतदानासाठी उत्साह अधिक होता. या मतदारसंघात १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदान होते. त्यापैकी ६ लाख ४० हजार महिला वर्गाने आवर्जून मतदान केले. त्यामुळे यंदा महिला वर्गाचा मतदान टक्का वाढला असल्याचे बोलले जात आहे.

मावळातील टक्का घसरला

सर्वाधिक लक्ष असलेला मावळ विधानसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का घसरला होता. गत झालेल्या निवडणुकीत म्हणजेच २०१९ मध्ये मावळामध्ये सरासरी ६२ टक्के मतदान झाले होते. भाजप, शिवसेना मानणारा हा वर्ग आहे. त्यातही राष्ट्रवादी ( अजित पवार गट) त्याचाही पाठिंबा मिळाला होता. मात्र तरीही मावळामध्ये केवळ ५५ टक्के मतदान झाले. त्यामुळे या कमी मतदान उमेदवाराला मागे खेचण्यास मारक ठरणार आहे.

भोसरीमध्ये केवळ ४९ टक्के मतदान

शिरूर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भोसरी विधानसभा मध्ये ४९ टक्के मतदान झाले आहे. विशेषतः या विधानसभा मध्ये सर्वाधिक दाटवस्ती असून, मतदानाची संख्या मोठी होती. मात्र, मतदान बाहेर न पडल्याने त्याचा फटका एकूण टक्केवारी बसला आहे. 

उमेदवारी बाबत स्थानिकांची असलेली नाराजी दिसून आली. भोसरीमध्ये ५ लाख ५१ हजार ५८२ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख ७२ हजार ५३९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान हे प्रमाण तुलनेने कमी आहे. यात पुरुष मतदारांनी ५१ टक्के तर , महिला मतदारांनी ४६ टक्के मतदान केले. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर आणि हडपसर यापैकी भोसरीमध्ये सर्व उमेदवारांचे लक्ष होते. कारण, हडपसर नंतर सर्वाधिक मतदान या ठिकाणी आहे. मात्र, या ठिकाणी मतदारांनी दाखवलेला निरुत्साह उमेदवारांना महागात पडणार आहे.

मतदानाच्या बेरजेचे गणित चुकणार

उमेदवाराकडून हक्काच्या ठिकाणी सर्वाधिक मतदान होईल, अशी अपेक्षा असते. त्यामुळे उमेदवारांना पिंपरी-चिंचवड शहरातून या कमी झाल्या मतदानाचा फटका बसणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी केलेले बेरजेचे गणित आणि मित्रमंडळीच्या आधारावरील मतदान याचे गणित चुकणार आहे. शहरातील कमी झालेले मतदान या दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी ठरणार आहे.

Share this story

Latest