Ajit Pawar : रोहित पवारांच्या मतदारसंघात अजित पवारांचे भाजपला पाठबळ?

अजित पवार(Ajit Pawar)राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये (NCP) फूट पाडून सत्तेत सहभागी झाल्यापासून आमदादर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी किरकोळ अपवाद वगळता त्यांच्यावर कायम टीका केली आहे.

Ajit Pawar

संग्रहित छायाचित्र

कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीचा निर्णय राम शिंदेंच्या सूचनेप्रमाणे घेणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांचे विधान चर्चेत

नागपूर : अजित पवार(Ajit Pawar)राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये (NCP) फूट पाडून सत्तेत सहभागी झाल्यापासून आमदादर रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी किरकोळ अपवाद वगळता त्यांच्यावर कायम टीका केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड या मतदारसंघात लक्ष घालत भाजपला पाठबळ देणे सुरू केल्याचे दिसून येत आहे.

कर्जत-जामखेड एमआयडीसीबाबत तेथील आमदार म्हणून रोहित पवार यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, अधिवेशनात यासंदर्भातील मुद्दा शुक्रवारी (दि. १५) चर्चेला आल्यावर अजित पवार यांनी या एमआयडीसीबाबत विधान परिषदेचे आमदार राम शिंदेंना श्रेय देण्याचा प्रयत्न केला. कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदेंना पराभूत करून रोहित पवार २०१९ मध्ये प्रथमच आमदार झाले.

‘‘कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीच्या प्रश्नावर आमदार राम शिंदे हे बारीक लक्ष घालून आहेत. तिथे एमआयडीसी करून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तिथे राम शिंदे यांच्या सूचनेप्रमाणेच लवकरच एमआयडीसीबाबत निर्णय घेऊ,’’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी रोहित पवार करत असलेल्या मागणीचे श्रेय भाजप आमदाराला दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात ते भाजपला बळ देत आहेत का, असा प्रश्न राजकीय क्षेत्रात चर्चिला जात आहे. आहे. भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात या मुद्यावरुन वाद सुरु आहे. यावर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी आपले वजन राम शिंदे यांच्या पारड्यात टाकले.

कांदा निर्यातबंदी, इथेनॉल आणि इतर पाच-सहा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह  यांची आज वेळ मागितली होती. मात्र, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही भेट आता पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारी होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.

सध्या कांदा निर्यातबंदी, इथेनॉलचा प्रश्न राज्यात गाजत आहे. निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात केंद्र सरकारशी बोलून यावर उपाय काढण्यासंदर्भात राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी या मुद्द्यांवर केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोलल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तसेच इथेनॉलसंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलल्याचे स्वत: अजित पवार म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता ही भेट सोमवार वा मंगळवारी होणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

‘पीएचडी’चा माझ्या बाजूने विषय संपला...

उपमुख्यमंत्री अजित पवार सांनी  पीएचडीसंदर्भातील केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्मणा झाला होता. दिलगिरी व्यक्त केलेली असल्यामुळे हा विषय आपल्यासाठी आता संपला असल्याचे ते शुक्रवारी म्हणाले.  ‘‘मी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या बाजूने हा विषय संपलेला आहे,’’ असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलायचे टाळले.  राज्य सरकारने जुन्या पेन्शनबाबत सहाय समिती गठीत केली आहे. ही समिती इतर राज्यांनी जुनी पेन्शन कशा स्वरूपात लागू केली, याचा अभ्यास करणार आहे. साधकबाधक चर्चा होऊन यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest