संग्रहित छायाचित्र
मुंबई : मला कुठल्याही पदाची गरज नाही. आम्ही काम जोराने करत आहोत. मी नाराज वगैरे नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, असे प्रतिपादन करत भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या नाराजीचे वृत्त फेटाळून लावले आहे.
किरीट सोमय्या यांची भाजपने विधानसभेच्या निवडणूक आयोग संपर्कप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली होती. किरीट सोमय्या यांनी हे पद नाकारले असून त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या. यावर ‘एक्स’ वर आपली बाजू मांडताना किरीट सोमय्या म्हणतात, गेली साडेपाच वर्ष कोणतंही पद माझ्याकडे नाही. भारतीय जनता पक्षातील सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे. १८ फेब्रुवारी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे अमित शाह यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यायला तयार नव्हते. तेव्हा पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस यांनी मला निघून जायला सांगितलं. तेव्हापासून आजपर्यंत मी जीव लावून काम केले आहे. मला कुठल्याही पदाची गरज नाही. आता हे त्यांनाही पटलं आहे. आम्ही काम जोराने करत आहोत. नाराजी वगैरे नाही. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल.
किरीट सोमय्या यांनी भाजपा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना एक पत्रही लिहिले. किरीट सोमय्या म्हणतात, साडेपाच वर्ष सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करत आहे. अनेक कामे मला दिलेली आहेत. ती कामे मी करत असतो. त्यामुळे मी पक्षाला असं सुचवलं की, सर्वच कामे मी करत आहे. निवडणूक आयोगाची कामेही मीच करत आहे. मला कुठली समिती वगैरे नको. शेवटी पक्षालाही ते पटलं. त्यानुसार पक्षाने त्यामध्ये सुधारणा केली. कोणत्याही विषयावर देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळे असोत किंवा मी असो. आमच्यामध्ये वेगळं मत असू शकतं. या मुद्यावर माझं वेगळं मत होतं.
मला दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रश्न उद्धभवत नाही. माझ्यासाठी देश प्रथम आहे, त्यानंतर भाजपा आहे असे सांगून ते म्हणतात, मी २०१९ मध्ये लोकसभेतही तेवढंच काम केलं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही तशाच प्रकारे काम केलं होतं. मी भाजपाचा एक सदस्य आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून माफियागिरी केली. आम्ही त्यावेळी पुरावे दिले. खुन्नस काढण्याचा कुठेही प्रयत्न केला नाही. राज्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना ३३ महिन्यांत विकासाच्या प्रकल्पांची कशी वाट लागली, ही एकएक गोष्ट जनतेसमोर येईल.