भाजप सत्तेत असतानाही शिवस्मारक का होत नाही?
मुंबई : केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम मार्गी का लागत नाही, असा प्रश्न स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे. स्वराज्य पक्षातर्फे कार्यकर्ते चला शिवस्मारक शोधायला या मोहिमेचा भाग म्हणून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर संभाजीराजे बोलत होते.
ते म्हणाले, अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाचे काय झालं ? शिवस्मारकाचा अंदाजे खर्च ७० कोटी आहे. अरबी समुद्रातील स्मारकाची घोषणा झाली, तेव्हा आम्हाला आनंद झाला. देशाच्या आर्थिक राजधानीत शिवाजी महाराजांचे सुशोभित स्मारक होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकाचे जलपूजन केले. त्याला आठ वर्षे उलटूनही काम सुरू झालेले नाही. गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला, पण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहिलेला नाही.
मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने गेल्या तीन दशकात राज्यात अनेक पक्षांनी दाखवली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप-शिवसेना युती सरकारने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले. काम सुरू झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. दुसरीकडे सरकारी नोंदी किंवा स्मारकांवरही कोट्यवधी रुपये खर्च झाले. येत्या काही दिवसांत जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील. मात्र अरबी समुद्रात हे शिवस्मारक अद्याप कुठे दिसत नाही. चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते.
संभाजीराजे म्हणाले, कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. हे स्मारक कुठे आहे? त्यामुळे आम्ही स्मारकाचे संशोधनाची मोहीम सुरू केली आहे. सरकारने राज्यातील १३ कोटी जनतेला उत्तर द्यावे. आम्ही कायदा हातात घेणार नाही. स्मारकाच्या ठिकाणी असलेले आमचे बोर्ड काढून टाकले आहेत. महायुतीचे बोर्ड तसेच आहेत. आम्ही समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार आहोत. ज्या बोटने आम्ही जाणार आहोत, त्यांना भाजपकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे.
गोंधळानंतर स्मारक पाहणीची परवानगी
जलपूजन केलेल्या जागेच्या पाहणीसाठी समुद्रात जाण्याकरता पोलिसांनी संभाजीराजे यांना परवानगी नाकारली. पोलिसांनी संभाजीराजे आणि कार्यकर्त्यांना अडवून धरल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलीस कार्यकर्त्यांना गाडीत डांबून नेत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक होत हस्तक्षेप केला. ते म्हणाले, माझे कार्यकर्ते काही आरोपी नाहीत. त्यांना कुठेही न्यायचे नाही. त्यांना आताच्या आता गाडीतून खाली उतरवा. तुम्ही दडपशाही करत आहात. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. या नंतर संभाजीराजे आणि डीसीपी मुंडे यांच्यात चर्चा झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोडून दिले. यानंतर संभाजीराजे यांनी एक छोटेखानी भाषण करत भूमिका मांडली. यानंतर पोलिसांनी संभाजीराजे यांच्यासह ५० जणांना अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन झालेल्या जागेपर्यंत जाण्यास परवानगी दिली. भाषणात संभाजीराजे म्हणाले, मी अनेक वर्षे शिवरायांच्या गडकिल्ल्यांचं जतन करत आहे. माझ्या प्रयत्नांमुळे रायगड किल्ल्याच्या संवर्धनाला सुरुवात झाली. सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना स्मारकाची घोषणा केली. २०१४ मध्ये भाजपनेही जाहीरनाम्यात शिवस्मारकाचा उल्लेख केला. २०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी घाईगडबडीत स्मारकाचे जलपूजन उरकले. त्यानंतर आठ वर्षे काहीच घडले नाही. त्यानंतर संभाजीराजे ५० कार्यकर्त्यांसह बोटीने समुद्रात जाताना पाहायला मिळाले. संभाजीराजे यांना दुर्बीणमधून स्मारकाच्या कामकाजाची पाहणी करण्यास परवानगी मिळाली आहे. वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.