संग्रहित छायाचित्र
पुणे: मूळचा काँग्रेसी विचारांचा परंतु, पुढे भाजपचा गड बनलेला पर्वती मतदारसंघ कोण राखणार, याची चर्चा विधानसभेच्या संभाव्य आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्या आहेत. भाजपमधील अंतर्गत रस्सीखेच आणि उमेदवारीसाठी स्पर्धा या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट तसेच कॉंग्रेसदेखील मतदारसंघावर दावे केले जात आहेत.
महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये पर्वतीच्या उमेदवारीवरून अंतर्गत शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीमध्ये भाजप सोडल्यास अन्य घटक पक्ष उमेदवारीविषयी फारसे आग्रही नसल्याचे जाणवते. या मतदारसंघात मनसेचे कार्यकर्ते लक्षणीय प्रमाणात असले तरी त्यांचा उमेदवार कोण असणार, याविषयी साशंकता आहे. झोपडपट्टीबहुल आणि मध्यमवर्गीय तसेच व्यापारीवर्गाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ पुण्यामधील मतदानाच्या बदलत्या ‘पॅटर्न’मुळे चर्चेत आलेला आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक १९७८ मध्ये झाली होती. त्यावेळी जनता पक्षाचे सुभाष सर्वगौड निवडणूक जिंकले होते. त्यानंतर, कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी समसमान पद्धतीने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवला. कॉंग्रेसकडून वसंत चव्हाण, शरद रणपिसे आणि रमेश बागवे आमदार झाले. तर, भाजपकडून दिलीप कांबळे, विश्वास गांगुर्डे आणि माधुरी मिसाळ आमदार झाल्या. १९८० पासून हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे चार वेळा तर भाजपकडे पाच वेळा राहिलेला आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी भाजपच्या माधुरी मिसाळ या विद्यमान आमदार आहेत. त्यांनी २००९, २०१४ आणि २०१९ अशी सलग तीन वेळा येथून निवडणूक जिंकली आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळाला होता. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पर्वती मतदारसंघातील सात प्रभागांतील २७ पैकी २३ भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, तर, कॉंग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत पर्वतीतून भाजपला मोठ्या मताधिक्याची अपेक्षा होती. मात्र, काही ठिकाणी भाजपला मतदान घटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट विधानसभेत नेमका काय परिणाम घडवते, याकडेही राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघ २००४ पर्यंत अनुसूचित जातीसाठी राखीव होता. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये हा मतदारसंघ खुला झाला. पर्वती मतदारसंघात मध्यमवर्गीय सोसायट्या, यासोबतच अतिउच्चभ्रू सोसायट्या आणि झोपडपट्टी भागाचाही लक्षणीय समावेश आहे. सहकारनगर, अरण्येश्वर, बिबवेवाडी, महर्षीनगर, मुकुंदनगर, स्वारगेट, पर्वती, सिंहगड रस्ता, माणिकबाग, बडगाव बुद्रुक, हिंगणे खुर्द, गंगाधाम सोसायटी, सॅलिसबरी पार्क, मित्रमंडळ कॉलनी भाग हा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय म्हणून गणला जातो. यासोबतच महर्षीनगर, मुकुंदनगर, लक्ष्मीनगर-पर्वती, सहकारनगर, दत्तवाडी, शिवदर्शन व पर्वती दर्शन हा पूरग्रस्त वसाहतींचा भाग आहे. तसेच, अप्पर इंदिरानगर, अप्पर-सुप्पर, औद्योगिक वसाहत, डायस प्लॉट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत - मार्केट यार्ड, प्रेमनगर वसाहत, तळजाई वसाहत, अण्णा भाऊ साठे वसाहत - अरण्येश्वर, सिद्धार्थ वसाहत, पानमळा आदी झोपडपट्ट्यांचादेखील या मतदारसंघात समावेश आहे. त्यामुळे संमिश्र लोकवस्तीचा भाग या मतदारसंघात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांना या दोन्ही प्रकारच्या मतदारांवर पकड घट्ट करावी लागणार आहे. चाळी-वसाहती-झोपडपट्टीमधील कॉंग्रेसचा मूळ मतदार तसेच अल्पसंख्याक मतदार यांच्यावर यांच्यावर महाविकास आघाडीची मदार आहे. तर, भाजपची मदार नवमतदार, झोपडपट्टीमधील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, शासनाच्या योजनांचे लाभार्थी तसेच मध्यमवर्गीय आणि व्यापारी वर्गावर आहे.
भाजपामध्ये त्रिकोणी रस्सीखेच
पर्वती मतदारसंघ १५ वर्षांपासून सलग भाजपाकडे राहिलेला आहे. मतदारसंघातील भाजपाच्या नगरसेवकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. यामध्ये माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि आमदार सुनील कांबळे अशा मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. मागील काही वर्षात नव्या नेतृत्वाने पक्षाकडे विधानसभा प्रतिनिधीत्वासाठी मागणी सुरू केली आहे. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनीदेखील उमेदवारीवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपाची तारांबळ उडणार हे नक्की.
मविआमध्ये मतदारसंघ कोणाकडे जाणार?
महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) या दोन्ही पक्षांनी पर्वती विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादीकडून अश्विनी कदम यांनी २०१९न्मध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आहे. कदम यांनी पुन्हा एकदा पर्वतीमधून तयारीला सुरुवात केली आहे. तर कॉंग्रेसचे माजी उपमहापौर उल्हास ऊर्फ आबा बागुल हेसुद्धा तयारीला लागले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी अर्ज भरला होता. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यावर उमेदवारी मागे घेतली होती. यंदा लोकसभेसाठीदेखील बागुल इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट नाकारण्यात आले. शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या भूमिका अद्याप गुलदस्तात आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार, याबाबत संभ्रम आहे.
सिंहगड रोड उड्डाणपूल पूर्णत्वाकडे जात आहे. त्याच्या पर्यायी रस्त्यांचे कामही पूर्ण झाले आहे. पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम, सिंहगड रोड पोलीस स्टेशन व पोलीस चौकी, श्री क्षेत्र पर्वती देवदेवेश्वर संस्थानची विकासकामे, आंबिल ओढा व नाल्यालगत सीमा भिंतीचे काम, पानशेत पुरग्रस्तांच्या १०३ सोसायट्यांना जमिनी मालकी हक्काने देण्याची कार्यवाही अशी भरपूर कामे केली आहेत. बिबेवाडी येथील ईएसआयसी हॉस्पिटलच्या पाचशे बेडचे काम सुरू आहे. स्वारगेट-कात्रज मेट्रो कामासाठी पाठपुरावा, खडकवासला-सिंहगड रोड-स्वारगेट-हडपसर या मेट्रो मार्गिकेचा पाठपुरावा, स्वारगेट येथील मल्टी हब, जनता वसाहत व मीनाताई ठाकरे वसाहत येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, गंगाधाम चौकातील उड्डाणपूल मंजुरी, श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे नदीकाठ विकसित करणे, विठ्ठलवाडी ते नांदेड सिटीच्या मागील बाजूस एलिव्हेटेड रस्ता करणे अशी कामे सुरू आहेत. या कामांच्या आधारे मी उमेदवारी मागत आहे.
- माधुरी मिसाळ, आमदार
मागील वीस वर्षांपासून नगरसेवक म्हणून काम करीत असताना लोकांची सेवा केली आहे. १५ वर्षांपासून विधानसभेची उमेदवारी मी मागत आहे. यंदाही मेरिटवर उमेदवारी मागितली आहे. सभागृहनेता म्हणून काम करताना शहराचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले. मार्केट यार्डचा उड्डाणपूल, स्वारगेट कात्रज मेट्रोसाठी पाठपुरावा, समान पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाक्या, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कामे केली आहेत. जनसंपर्कावर मी भर दिला असून राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचवित आहे. विविध उपक्रम सुरू आहेत. लोकसभेला माझ्या प्रभागात सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे यंदा मी लढणार आणि जिंकणार, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना दिला आहे.
- श्रीनाथ भिमाले, भाजप
विधानसभेच्या हालचाली चालू झाल्यापासून आतापर्यंत दोन वेळा मतदारसंघ पिंजून काढला आहे. पत्रके घरोघरी पोहोचवण्यात आली आहेत. तसेच, बूथ कमिट्यांची रचना करण्यात आली आहे. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मी यथाशक्ती विद्यमान आमदारांना टक्कर दिली होती. पराभूत झाल्यानंतरही मी काम करतच राहिले. सुमारे दीड लाख नागरिकांशी विनामूल्य महा-ई-सेवा केंद्र व कदम डायग्नोस्टिक येथील वैद्यकीय सेवाद्वारे संपर्क प्रस्थापित केला आहे. विद्यमान आमदार आणि भाजपाबाबत नाराजी आहे. माझे काम, आंदोलने, मेळावे सुरूच आहेत. मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
- अश्विनी कदम, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)
महाविकास आघाडीमध्ये पर्वती मतदारसंघ कॉंग्रेसला सोडायला हवा. २०१९ च्या वाटाघाटीत कसब्याच्या बदल्यात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. मात्र, पर्वती कॉंग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. आम्ही यापूर्वी तीन वेळा पक्षाकडे उमेदवारी मागितली. मात्र, दरवेळी ती नाकारण्यात आली. यंदा मात्र आम्ही लढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कॉंग्रेसला पोषक वातावरण असून वर्तमान आमदार निष्क्रीय आहेत. त्यांचे कोणतेही काम दिसत नाही. त्यामुळे कॉंग्रेसचा उमेदवार निवडणून येऊ शकतो. मी त्या अनुषंगाने तयारी केली आहे.
- आबा बागुल, काँग्रेस
पर्वतीमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता आजही माझ्यासोबत आहे. मी मूळ शिवसैनिकांची फळी तुटू दिलेली नाही. त्यांना जोडून ठेवलेले आहे. मतदारसंघात काम केले आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली तर या ठिकाणी मी निवडून येऊ शकतो.
- बाळासाहेब ओसवाल, शिवसेना (ठाकरे गट)
महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे पर्वतीची जागा आम्ही मागितलेली नाही. मात्र, या ठिकाणी उमेदवार बदलण्याची आवश्यकता आहे. भाजपासह अन्य मतदारांमध्ये त्यांच्याबाबत नाराजी आहे. विद्यमान आमदारांबाबत ‘अँटी इन्कबंन्सी’ दिसून येत आहे. कामे झालेली नसल्याची मतदारांची तक्रार वारंवार ऐकायला मिळते. महायुती म्हणून जो उमेदवार दिला जाईल त्याचे काम राष्ट्रवादीकडून करण्याचा आमचा निर्णय आहे. उमेदवार जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली जाईल.
- सुभाष जगताप, नेते राष्ट्रवादी (अजित पवार गट)
विधानसभा २०१९ आकडेवारी (उमेदवार आणि मते)
माधुरी मिसाळ (भाजपा) - ९७,०१२ (५५.८२ टक्के)
अश्विनी कदम (राष्ट्रवादी कॉँग्रेस) - ६०, २४५ (३४.६७ टक्के)
२०२४ पुणे लोकसभेतील पर्वती विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदान ३ लाख ४१ हजार ०५५
झालेले मतदान १ लाख ८९ हजार १८४
मतदानाची टक्केवारी ५५५.४७ टक्के