Pune BJP : देवधर, मुळीक की मोहोळ कुणाच्या हाती पुण्याचे कमळ

मागील दोन लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा जिंकणाऱ्या भाजपने (BJP) २०२४ मध्येदेखील ही जागा आपल्याकडे ठेवण्याच्या दृष्टीने जोरात तयारी चालवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) आधी जगदीश मुळीक (Jagdish Mulik) आणि नंतर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची नावे समोर

Pune BJP

देवधर, मुळीक की मोहोळ कुणाच्या हाती पुण्याचे कमळ

सुनील देवधर यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे प्रथमच ‘सीविक मिरर’शी बोलताना केले स्पष्ट

*मुळीक आणि मोहोळ यांनी होर्डिंग, विविध कार्यक्रम, जनसंपर्क आणि मेळावे या माध्यमातून जाहीरपणे आपण इच्छुक असल्याचा मेसेज दिला आहे.

*देवधर यांनी कोणताही गाजावाजा न करता शहरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत

मागील दोन लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा जिंकणाऱ्या भाजपने (BJP) २०२४ मध्येदेखील ही जागा आपल्याकडे ठेवण्याच्या दृष्टीने जोरात तयारी चालवली आहे. आगामी  लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) आधी जगदीश मुळीक (Jagdish Mulik) आणि नंतर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची नावे समोर आल्यानंतर भाजपच्या इच्छुकांमध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर (Sunil Devdhar) यांच्या नावाचीही भर पडली आहे. ‘सीविक मिरर’सोबत संवाद साधताना सुनील देवधर यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे ‘देवधर, मुळीक की मोहोळ? कुणाच्या हाती पुण्याचे कमळ?,’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुण्याच्या लोकसभा उमेदवारीवरुन मागील काही महिन्यांपासून भाजपच्या गोटात कमालीचे राजकारण रंगले आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आपली दावेदारी प्रबळ करण्यास सुरुवात केली आहे. हे दोन्ही गट उघडपणे स्पर्धा करू लागले असतानाच आता तिसऱ्या इच्छुकाचीही या स्पर्धेत एन्ट्री झाली आहे. सुनील देवधर यांनी पुण्याचे ‘नेतृत्व’ करायला आवडेल, असे म्हणत पहिल्यांदाच पुण्यामधून निवडणूक लढण्यास तयार असल्याचे ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले. ‘‘आपल्याला पक्षाच्या पातळीवर कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. मात्र, तिकीट मिळाले तरी आणि नाही मिळाले तरी पुणेकरांची सेवा करण्याची इच्छा आहे,’’ असे देवधर यांनी पाहिल्यांदाच सांगितले.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यामधील लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर अद्याप पोटनिवडणूक लावण्यात आलेली नाही. महापालिका विसर्जित होण्यापूर्वी अडीच वर्षे महापौर असलेल्या आणि त्यापूर्वी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी नगरसेवकांच्या माध्यमातून शहर पातळीवरील चेहरा म्हणून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोविड काळामध्ये शहराच्या विविध भागात जाऊन काम केले. यानिमित्ताने त्यांचा शहरात संपर्क वाढला. लोकसभेसाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. बैठका, मेळावे, शिबिरे आदी माध्यमातून त्यांचा उमेदवारी मिळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे.

दुसरीकडे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही आपण लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार असल्याचे वारंवार पक्षाला आणि पक्ष नेत्यांना जाणवून दिले आहे. सध्या शहरात सगळीकडे मुळीक यांनी होर्डींग लागत आपणही मैदानात असल्याचा मेसेज दिला आहे. विविध कार्यक्रम, जनसंपर्क आणि मेळावे, भेटीगाठी यांच्या माध्यमातून मुळीकदेखील तयारीला लागलेले आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभवदेखील आहे. शहरातील भाजपमध्ये मोहोळ आणि मुळीक असे दोन गट स्पष्टपणाने दिसत आहेत.

मुळीक आणि मोहोळ या दोघांमधील ही स्पर्धा अधिक तीव्र होत असतानाच भाजपचे नेते सुनील देवधर यांनी पुण्याकडे मोर्चा वळवला आहे. ईशान्य भारतात आठ वर्षे, पुण्यात तीन वर्षे आणि मुंबईत दोन वर्षे संघ प्रचारक राहिलेले देवधर हे ‘माय होम इंडिया’ ही ईशान्य भारतासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था चालवितात. त्यांनी ईशान्य भारत प्रकोष्ठ प्रमुख, गुजरातमधील दहा विधानसभा मतदारसंघांचे प्रमुख, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात नरेंद्र मोदी यांचे प्रचारप्रमुख म्हणून काम केले आहे. यासोबतच कम्युनिस्टांचा २५ वर्षे बालेकिल्ला राहिलेल्या त्रिपुरामध्ये सत्तापरिवर्तन घडवून आणण्यात देवधर यशस्वी ठरले होते. सध्या ते आंध्रप्रदेशचे सहप्रभारी आहेत. देवधर यांनी ‘सीविक मिरर'शी बोलताना स्पष्ट केले की ‘‘राज्यसभेमधून निवडले जाऊन खासदार होण्याचा सोपा मार्ग न निवडता, दीर्घकाळ राष्ट्रीय राजकारणात जायचे असेल तर जनतेकडून कौल घेऊनच दिल्लीत जाणे हा श्रेष्ठ आणि प्रशस्त मार्ग आहे. याच विचाराने आपण लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.’’

देवधर यांनीदेखील शहरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. कोणताही गाजावाजा न करता त्यांचे शहरात संपर्कसत्र सुरू आहे. यावर अन्य दोन्ही गट बारीक लक्ष ठेवून आहेत. मोहोळ यांनी वाढदिवसाच्या दिवशी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करीत एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.  दुसरीकडे मुळीकदेखील त्यांच्या पद्धतीने आपली मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या शहर पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्याच्या इच्छुकांच्या यादीत देवधरांचे नाव असल्याच्या प्रश्नावर बोलणे टाळले होते. लोकसभा निवडणुकीसाठी फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांसाठी मोहोळ, मुळीक आणि देवधर आपापल्या परीने रणनीती आखत आहेत.

गिरीश बापट यांच्या निधनापश्चात केंद्रीय पातळीवर पुण्याचे नेतृत्व करू शकणारे नेतृत्व नाही. पुणे जशी सांस्कृतिक राजधानी आहे, तसेच ही आयटी सिटी आहे. औद्योगिक शहर आणि शिक्षणाचे माहेरघर अशीदेखील पुण्याची ओळख आहे. पुण्याने देशाच्या जडणघडणीत आजवर मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. मात्र, राजकीय नेतृत्वाकडून पुण्याच्या पदरात फारसे काही पडू शकले नाही. पुण्याची अवस्था बकाल शहर अशी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काम करणारा उमेदवार पुणेकरांना अपेक्षित आहे. पुण्याची उमेदवारी कोणाच्या पदरात पडते, हे आगामी काळातच समजेल. मात्र, सध्या तरी भाजपच्या अंतर्गत गोटात उमेदवारीची स्पर्धा अधिक तीव्र होताना दिसत आहे.

पुण्याचे नेतृत्व करण्याची आपली इच्छा आहे. लोकसभा उमेदवारीबाबत पक्षाच्या केंद्रीय पातळीवरच निर्णय होईल. पक्षाचा निर्णय अंतिम असतो. मला अद्याप पक्षाकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. मात्र, लोकसभेचे पुण्याचे तिकीट मिळाले अथवा नाही मिळाले तरीदेखील पुणेकरांची सेवा करीत राहणार आहे.

- सुनील देवधर, भाजप नेते

पक्षाने संधी दिली तर लोकसभा निवडणूक नक्की लढणार. दूरदृष्टी ठेवून शहरासाठी विकासकामे करण्याचा माझा मनोदय आहे. पक्ष जेवढा मोठा तेवढी स्पर्धा अधिक असते. सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो. याकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. याबाबत पक्षाचा निर्णय अंतिम असतो.

- जगदीश मुळीक, माजी शहराध्यक्ष, भाजप

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest