‘मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या’, दीपक मानकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे : मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असून समाजाची भावना आणि गरज लक्षात घेता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
दीपक मानकर यांनी म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणासाठी मराठा समाजाच्या चालू असलेल्या लढ्याची व्याप्ती दूरवर पोहोचली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हा लढा अधिकच तीव्र होत चालला आहे. या लढ्याची व्याप्ती आणि आत्ताची सामाजिक परिस्थिती पाहता तसेच समाजाच्या भावना लक्षात घेता आरक्षणाचा निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे, असे वाटते, असे दीपक मानकर यांनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. त्यांच्या या लढ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर शाखेतर्फे पूर्ण पाठिंबा आहे. राज्य शासनानेदेखील मराठा समाजास कोणत्याही कायदेशीर त्रुटी न ठेवता त्वरित आरक्षण देण्याचे सकारात्मक पाऊल उचलावे आणि समाजास न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी एकनाथ शिंदे यांना या पत्रात केले आहे.