शिवसेनेमुळेच काँग्रेसचे १३ खासदार झाले

मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Sep 2024
  • 11:55 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आमदार नितीन देशमुख यांच्या विधानाने 'मविआ'त धुसफूस, आम्हीच मुळापासून सक्षम असल्याचा काँग्रेसचा दावा

मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिवसेना काँग्रेस सोबत होती म्हणून लोकसभेत एकाचे तेरा झाले, असे विधान आमदार देशमुख यांनी केले आहे. याच वक्तव्यानंतर आता काँग्रेसकडूनही याचे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून तो मुळापासून सक्षम असल्याचे सांगत आमदार नितीन देशमुख यांनी आपली चूक दुरुस्ती करावी,  अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतही महायुतीप्रमाणे काही नेत्यांमधील आरोप- प्रत्यारोप चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांनी एकत्र निवडणूक लढवत महायुतीची पिछेहाट केली. या निवडणुकीत राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला. १३ जागा काँग्रेसला जिंकता आल्या, अकोल्यात यावरूनच आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसबाबत केलेले एक वक्तव्य चर्चेत आले आहे. माध्यमातून बोलताना आमदार नितीन देशमुख यांनी हे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेमुळे राज्यात काँग्रेसच्या एका जागेच्या तेरा जागा झाल्या, असा दावा त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे यावरून काँग्रेसनेही आमदार देशमुख यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमदार नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. एकंदरीतच आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतही महायुतीप्रमाणे काही नेत्यांमधील आरोप- प्रत्यारोप चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. 

तुमचा स्ट्राईक रेट पाहा - प्रकाश तायडे

आमदार देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यावरून काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. देशमुखांनी आपले विधान दुरुस्त करावे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. तो मुळापासून सक्षम आहे. त्यांनी दोन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट पाहावा, असे काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी म्हटले आहे. तायडे म्हणाले, लोकसभेत महाविकास आघाडीच्या युतीमुळे काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष झाला. एवढी ताकद महाविकास आघाडीत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा लढवून १३ जागा जिंकल्या तर शिवसेनेने २३ जागा लढवून ९ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी ही काळाची गरज आहे. मात्र कुणी जर स्वतःच्या क्षमतेबाबत गैरसमज करून घेत असेल तर त्यांनी दुरुस्त करावे. हे विधान त्यांनी दुरुस्त करावे. महाविकास आघाडीत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत १७ जागा लढवून १३ जागी विजय मिळवला हा स्ट्राईक रेट आहे. काँग्रेसचा आणि शिवसेनेने २३ जागा लढवून फक्त ९ जागा जिंकल्या हा त्यांचा स्ट्राईक रेट आहे. शिवसेनेने याचे आत्मचिंतन करावे, असा टोलाही तायडे यांनी लगावला आहे.  नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एक नंबर आल्याचेही ते म्हणाले. 

आम्ही सोबत असल्यानेच...
 आमदार नितीन देशमुख यांनी शिवसेना सोबत असल्यानेच काँग्रेस एका खासदारावरून १३ खासदारांवर गेली. आम्ही काँग्रेसचे एकाचे तेरा केले. ही शिवसेनेत ताकद आहे. भाजप २३ खासदारांवरून ९ खासदारांवर आली. हे केवळ शिवसेनेच्या जोरावर घडल्याचा दावाही आमदार देशमुखांनी केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest