Pune : भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना झापले

भाजपचे सर्व महत्वाचे नेते लोकसभेच्या तयारीला लागले असतानाच पुण्यात या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील नाटक तसेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रकरणात गोंधळ

BJP Pune

भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना झापले

पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील नाटक तसेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रकरणात घातलेल्या गोंधळाबाबत नाराजी

भाजपचे सर्व महत्वाचे नेते लोकसभेच्या तयारीला लागले असतानाच पुण्यात या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील नाटक तसेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रकरणात गोंधळ (Nikhil Wagle case) घातला. यामुळे नारजा झालेल्या भाजपच्या (BJP) दिल्लीतील नेत्यांनी पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना झापल्याची माहिती समोर आली आहे. (Pune)

आयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेमुळे देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येकाची घरोघरी श्रीरामाच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. पुण्यातील या सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येवून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अवघे पुणे शहर भगवेमय झाले होते. या वातावरणाचा फायदा घेत लोकसभा निवडणुकीचा डंका पोहचविण्याची रणनीती भाजपने आखली होती. परंतु शहरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घातलेल्या गोंधळामुळे वातावरण गढूळ झाले आहे. याचा फटका लोकसभेच्या निवडणूकीला बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचे कळते.

आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. असे असताना विरोधी पक्षांला पुण्यातील भाजपच्या नेत्यांनी आयते कोलित हाती दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता. तो प्रयोग अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या युवकांनी बंद पाडला. त्यावरून संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात धुडघूस घालण्यात आला होता. त्यामुळे पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याप्रकरणी काही जणांवर गुन्हादेखील करण्यात आला. या घटनेमुळे सर्वच स्तरातून भाजपवर टीका करण्यात आली होती. याचे पडसाद थेट केंद्रामध्ये उमटले आहेत. हा प्रकार शांत होत नाही तोच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रकरणावरून पुण्यातील भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांची पुन्हा नाराजी ओढवून घेतली.

वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टीका केली होती. त्यावर आम्ही निखिल वागळेंची सभा होऊ देणार नसल्याचे खुले आव्हान पुण्यातील भाजप नेत्यांनी दिले होते. त्यानंतर सभाच होणारच, असा निर्धार करत वागळे पुण्यात दाखल झाले. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. वागळे यांची गाडी फोडली, शाईफेक केली, विरोधात घोषणा दिल्या. तसेच वाहनाला लाथा मारण्यात आल्या. त्यानंतरही वागळे यांची सभा यशस्वी झाली.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विरोधानंतरही वागळे यांना सभा घेण्यात यश आले. त्यामुळे कॉंग्रेससह इतर पक्षांनी ‘‘वागळे यांचा विजय झाला. भाजप तोंडावर पडली,’’ अशी टीका केली. एका ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला झाल्याने याची दखल देशभर घेण्यात आली. तसेच याचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार का केले जात आहेत, याचा जाब भाजपच्या दिल्लीतील बड्या नेत्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना विचारत त्यांना झापल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ज्येष्ठ नेत्यांनी झापल्यामुळे आता पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर तोंड लपविण्याची वेळ आली आहे. भाजपचे कार्यकर्ते पुण्यामध्ये तेढ निर्माण करत असल्याचे यातून समोर आले आहे. याचे विपरित सामाजिक आणि राजकीय परिणाम होऊ शकतात, हे लक्षात आणून देत केंद्रातील भाजप नेत्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापले . त्याचबरोबर यापुढे अशा गोष्टी न करता लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

‘निर्भय बनो’मुळे भाजपचे नुकसान होणार?

नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात बोलले अथवा विरोध केला तरी ईडीची नोटीस येत आहे. तसेच भाजपमध्ये प्रवेश करा अन्यथा जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा, असा अप्रत्यक्ष दम भाजप सरकार देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना देत आहे. यापैकी काहीच केले नाही तर थेट कारवाई केली जात असून त्रास दिला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. सत्ताधारी पक्षाने काही केले तरी आम्ही घाबरणार नाही. आमच्या हक्कांवर निर्बंध आणले तरी मागे हटणार नाही, असा निश्चयच आता भाजपविरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांनी आणि नेत्यांनी केला आहे. त्याच धर्तीवर ‘‘कोणत्याही धमकीला भीक न घालता आम्ही आमची विचारधारा पुढे घेवून जाऊ... लढत राहू... एकवेळी मरण पत्करु, पण शरण जाणार नाही,’’ असा संदेश हल्ल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी दिला होता. त्यानंतर निर्भय बनो ही सभा यशस्वी झाली. या यशस्वी सभेमुळे आता राज्यभरात या नावाने सभा होतील काय? अशा सभांना कितपत प्रतिसाद मिळणार? त्यामुळे भाजपचे काय नुकसान होणार, हे येत्या काही दिवसात समोर येणार आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest