Sharad Pawar : शरद पवारांसोबत जाण्यासाठी इच्छुकांना अजित पवार यांच्याकडून धमक्या

राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील सुप्त संघर्ष वाढत आहे. राष्ट्रवादी (NCP)काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटात जाऊ पाहणाऱ्या माजी नगरसेवकांना अजित पवार यांच्याकडून धमकावल्याचा थेट आरोप माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बैठकीत केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 5 Nov 2023
  • 08:26 pm
Sharad Pawar

संग्रहित छायाचित्र

पुणे : राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील सुप्त संघर्ष वाढत आहे. राष्ट्रवादी (NCP)काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटात जाऊ पाहणाऱ्या माजी नगरसेवकांना  अजित पवार यांच्याकडून धमकावल्याचा थेट आरोप माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बैठकीत केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकारिणीची बैठक  शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात झाली. या बैठकीत सर्व सेलचे पदाधिकारी व अध्यक्ष सहभागी झाले होते. यावेळी हडपसर विधानसभेचे पदाधिकारी प्रवीण तुपे यांनी थेट आरोप केला की, अनेक आजी-माजी नगरसेवक शरद पवार गटात जाण्यास इच्छुक आहेत, मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांच्या गटनेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील एक शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मोदीबागेतील निवासस्थानी गेले होते. या शिष्टमंडळात माजी नगरसेवक योगेश ससाणे, माजी उपमहापौर नीलेश मगर यांचाही समावेश होता. याबाबत हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. अजित पवार यांनी स्वत: योगेश ससाणे यांना फोन करून त्यांची भूमिका जाणून घेतल्याचे समोर आले. निलेश मगर हे रोहित पवार यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्याबाबत कोणीही काहीही बोलले नाही. माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनीही याबाबत मौन बाळगणे पसंत केले.

पुण्यात आज (रविवार) शरद पवार गटाच्या कार्यकारिणीची मासिक बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष आपल्या भागातील कामाचा अहवाल देत होते. काही माजी नगरसेवक शरद पवार गटात जाण्यास इच्छुक असल्याचे हडपसरचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी सांगितले. 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पदाधिकार्‍यांनी विनाकारण राजकारण करू नये.  शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मानणाऱ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम केले पाहिजे. जे पक्षात राहून फक्त पदे घेतात आणि काम करत नाहीत त्यांची गय केली जाणार नाही.  त्यांना पदावरून हटविले जाईल. पक्षासाठी वेळ देणाऱ्यांच संधी मिळेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest