Aditya Thackeray Meet CM Fadnavis | आदित्य ठाकरेंनी सलग तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; जाणून घ्या, नेमकं कारण काय?

आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. दोन्ही नेत्यांमधील मागील महिनाभरातील ही तिसरी भेट असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 9 Jan 2025
  • 05:41 pm
Aditya Thackeray,  Devendra Fadnavis,

प्रातिनिधिक छायाचित्र....

Aditya Thackeray Meet CM Fadnavis (Mumbai)। विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे अन् भाजप पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चा सुरू आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आलीय. यामध्ये भाजपला बहुमत मिळालंय, त्यासोबत भाजपने अनेक महत्वाची खाती स्वत:कडे ठेवलीत. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. दोन्ही नेत्यांमधील मागील महिनाभरातील ही तिसरी भेट असल्याने चर्चांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे फडणवीसांना का भेटले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती आहे. तर मुंबईत सध्या गाजत असलेला टोरेस घोटाळा याबाबतही आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे.

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केलीय. यामध्ये पाण्याचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी आणलेल्या धोरणानुसार, मुंबईतील प्रत्येक व्यक्तीला पाणी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. मात्र याआधीच्या मिधें सरकारने ह्यावर आणलेली स्थगिती त्वरीत उठवावी. जेणेकरुन सर्व मुंबईकरांना ह्याचा लाभ मिळेल.

आजच्या भेटीत दुसरा महत्वाचा मुद्दा पोलीस वसाहतींचा होता. आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्‍यांना म्हणाले की, निवृत्त पोलीस कुटुंबांना पोलीस वसाहतींमध्ये राहण्यासाठी लागणाऱ्या दंड कमी करावे. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईत कायमस्वरुपी घरे उपलब्ध उपलब्ध करुन द्यावीत. महाविकास आघाडी सरकारने नवीन पोलीस वसाहतींसाठी 600 कोटींची तरतूद केली होती. वरळी, माहिम, नायगाव, कुर्ला येथील पोलीस वसाहतींचे प्रस्ताव मागील 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत, ते पुन्हा सुरु करावेत.

कलेक्टर जमीन फ्री होल्ड करण्यासाठी प्रीमियम कमी करणे. कलेक्टर जमिनीच फ्री होल्ड रुपांतरण करण्यासाठी प्रीमियम कमी करण्याचे धोरण लवकरात लवकर लागू करावे, यासंदर्भात देखील आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा केल्याचं समजतंय. मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिलीय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आमदार आदित्य ठाकरेंनी आज तिसऱ्यांदा त्यांची भेट घेतली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मोकळ्या मनाने इथे आलो आणि मुंबईतील समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. यावेळी मविआ सरकारच्या काळातील जी सर्वांसाठी पाणी योजना होती ती पुन्हा सुरू करावी. मुंबईतील प्रत्येकाला पाणी मिळायला हवे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठवण्याबाबत फडणवीस सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this story

Latest