File Photo
श्रीगोंदे : आमच्या पक्षातील सर्व दोष काढून घेतले आणि त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे आणि राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानतो, अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. मोदी आणि शाह यांच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगले यश मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यामध्ये जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली असून ही यात्रा श्रीगोंदा येथे आल्यावर ते बोलत होते. यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके , युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी संघटनेचे सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राहुल जगताप आदी मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, सर्व नेते एकत्र असताना मागील लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार खासदार निवडून आले होते. आता सर्वजण सोडून गेले आणि आमचे आठ खासदार निवडून आले आहेत. या यशाचे श्रेय आम्ही मोदी आणि शाह यांना देतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेते देशात व राज्यात काय तोऱ्यामध्ये वागत होते हे सर्वांनी पाहिले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या बूथ कमिट्या कोठे वाहून गेल्या हे देखील समजले नाही. याचे कारण ईडीसारख्या संस्था सांभाळणाऱ्यांना माणसे सांभाळता आली नाहीत. शरद पवार यांनी मात्र आजपर्यंत माणसे जपल्यामुळे हे यश मिळाले. रिझर्व बँकेकडून आठ लाख कोटी रुपयांचे यापूर्वीच कर्ज घेतलेले असताना पुन्हा नवीन कर्जाची मागणी राज्य सरकारने केली आहे. याचा अर्थ आम्ही सत्तेवरून जाणार आहोत, परंतु जाताना राज्याची वाट लावून जाणार अशी त्यांची भूमिका असल्याची टीका पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी राज्यामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर कोरडे ओढले.
यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, देशातील जनतेला भाजपने ईडी काय असते हे दाखवले. या संस्थेमुळेच साहेबांचे बोट धरून राजकारणात आलेल्यांनी त्यांची बोट सोडले. सध्या त्यांची अवस्था भाजपने किती वाईट केली आहे हे सर्व जनता पाहात आहे. कोल्हे यांच्या टीकेचा रोख अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर होता.
यावेळी माजी आमदार राहुल जगताप पाटील म्हणाले की, कारखान्यासाठी एनसीडीसीचे कर्ज मिळत असतानाही केवळ मी साहेबांच्या सोबत आहे म्हणून जाणीवपूर्वक डावलले गेलो आहे. तुम्ही कितीही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करा, मला कितीही अडचणीत आणा, तरीही मी श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या पाठिंब्यावर साहेबांच्या सोबत कायम राहणार आणि साहेबांची साथ कधीही सोडणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कारखान्याचे राहिलेले पैसे ५ ऑक्टोबरपर्यंत देण्यात येतील.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.