संग्रहित छायाचित्र
गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील पर्यटकांची संख्या कमी झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता अलिकडेच आलेली आकडेवारी पाहिली तर सोशल मीडियावर करण्यात येणारा दावा हा सपशेल खोटा असल्याचे समोर आले आहे. देशातील आणि परदेशातील पर्यटकांसाठी गोवा आजही आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे, हे पर्यटकांच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. नाताळ, इयरएंड या दोन्ही वेळी गोव्यातील गर्दीने नवे विक्रम प्रस्तापित केले आहेत.
रेकॉर्डब्रेक पर्यटकांचा ओघ
गोव्यातील पर्यटकांत लक्षणीय वाढ झाली आहे. परिसरातील सर्व हॉटेल्स जवळ-जवळ पूर्ण व्यापून गेले आहेत. समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यानी पर्यटकांना घातलेली भुरळ पर्यटकांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसत आहे. पर्यटक आता उत्तरेकडील केरी आणि दक्षिणेकडील कानाकोना यांसारख्या कमी माहिती असलेल्या ठिकाणांचा शोध घेतानाही दिसत आहेत. अंजुना आणि कलंगुट सारख्या लोकप्रिय ठिकाणांवर तर विक्रमी गर्दी दिसत आहे.
पसरल्या निराधार अफवा
चायना इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन सेंटरच्या सर्वेक्षणातून गोव्यात गर्दी कमी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. सोशल मीडियावर त्या फिरल्या होत्या. गोव्यातील वाढत्या महागाईवरही काही पोस्ट आल्या होत्या. गोव्याचे किनारे आणि रस्ते रिकामे असल्याचा आरोप काहींनी केला होता. मात्र हे दोन्ही दावे चुकीचे आहेत आणि डेटाद्वारे असमर्थित आहेत, हे आता सिद्ध झाले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेले आर्थिक निर्देशक गोव्याच्या भरभराटीचा पुरावा देत आहेत.
महसूलमध्ये विक्रमी वाढ
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी एकट्या डिसेंबर 2024 महिन्यात 75.51 कोटी मिळाले. एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत 4,614.77 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षी याच महिन्यातील आकडेवारी पाहिली तर त्यात 365.43 कोटींची वाढ झालेली दिसली. गेल्यावर्षीच्या तुलनेत GST महसुलात 9.62% तर VAT संकलनात 6.41% वाढ झाली.
गोवा आजही लोकप्रिय
गोवा हे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे. देशांतर्गत पर्यटकांसाठी, समुद्रकिनारे, वारसास्थळे आणि बाजारपेठांचे अनोखे मिश्रण येथे पहायला मिळते. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांना गोव्याचे मोहक, प्रसन्न वातावरण आणि समृद्ध सांस्कृतिक वातावरण आकर्षित करत आले आहे. जागतिक पर्यटनातील हॉटस्पॉट म्हणून गोव्याची नवी ओळख निर्माण होत आहे. त्यामुळेच चायनाने केलेले दावे हे निरर्थक असल्याचे महसूलाच्या आकडेवारीवरुन सिद्ध झाले आहे.