प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर २' हा सिनेमा २७ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या सिनेमाबाबत एक पोस्ट केली आहे. त्यांनी यासंदर्भात दिग्दर्शक प्रवीण तरडेंवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला प्रवीण तरडेंनी रोखठोक उत्तर दिले आहे. या चित्रपटात एकनाथ शिंदेंच्या बंडाचा प्रसंग आहे.
या प्रसंगावरुन आणि इतर प्रसंगांवरुन शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना खडे बोल सुनावले. सुषमा अंधारेंनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रवीण तरडेंवर हल्लाबोल केला होता, याबाबत बोलताना आता तरडेंनी सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा आणि मगच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात, असे प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनेत माझा प्रवेश हा गद्दारी झाल्यानंतर म्हणजे २८ जुलै २०२२ ला झाला. पण मतांसाठी निवडणुकिसाठी थुकरट युक्ती तरडेंनी दाखवली आहे. एकनाथ शिंदे सांगताहेत गद्दारीचे एक कारण सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या. प्रवीण तरडेजी कलेशी बेईमानी म्हणतात ती हीच का?, अशी पोस्ट अंधारे यांनी त्यांच्या एक्सवरती लिहली आहे. प्रवीण तरडेंनी कलेशी बेईमानी केल्याचा आरोप या पोस्टमधून त्यांनी केला आहे. सुषमा अंधारेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मात्र याबाबत जेव्हा प्रवीण तरडेंना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी थेट उत्तर दिले आहे.
सुषमा अंधारेंनी बहुदा सिनेमा पाहिला नाही. त्यांनी कुणाकडून ऐकले असेल. त्यांनी सिनेमा पाहिला आणि तो संवाद नीट ऐकला तर त्यांना समजेल. मुळात मी त्या संपूर्ण सीनमध्ये कुणाचे नावच घेतलेले नाही. मलाही आश्चर्य वाटले की सुषमाताई असे बोलल्या. सुषमा अंधारे एका राजकीय पक्षाचे काम करतात, मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी सिनेमा पाहावा. सिनेमा पाहिला तर त्यांना प्रश्नच पडणार नाही. चित्रपट विरोधकांनी पाहिला तर त्यांनाही तो आवडेल कारण ती आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची, बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे.
आम्ही सिनेमा बनवला आहे. बाकी कुठल्या गोष्टीशी आमचा संबंध नाही. सिनेमा पाहिला तर हा प्रश्न पडणार नाही. सिनेमा पाहिला नाही तर अनेक प्रश्न पडतील, असे म्हणत प्रवीण तरडेंनी सुषमा अंधारेंना चोख उत्तर दिले आहे. 'धर्मवीर २' मध्ये आनंद दिघे, त्यांचे हिंदुत्व इथपासून ते एकनाथ शिंदेंनी केलेले बंड आणि त्यानंतरचा त्यांचा प्रवास काय होता ते दाखवण्यात आले आहे. या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता त्यावरुन आरोप केले जात आहेत.