बिनधास्त बेधडक स्वरा...

अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वराने तिच्या या रोखठोक बोलण्याच्या स्वभावामुळे अनेकदा काम गमावल्याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत स्वराने सांगितले की, तिच्या या मनमोकळ्या स्वभावामुळे, बेधडक वक्तव्यांमुळे केवळ दिग्दर्शक-निर्मात्यांनीच नव्हे तर इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांनीही तिच्यापासून फारकत घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 18 Jun 2024
  • 04:06 pm
Entertainment news, swara bhaskar

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वराने तिच्या या रोखठोक बोलण्याच्या स्वभावामुळे अनेकदा काम गमावल्याचा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत स्वराने सांगितले की, तिच्या या मनमोकळ्या स्वभावामुळे, बेधडक वक्तव्यांमुळे केवळ दिग्दर्शक-निर्मात्यांनीच नव्हे तर इंडस्ट्रीतल्या काही कलाकारांनीही तिच्यापासून फारकत घेतली.

मी पीडित आहे असे मला दाखवायचे नाही. कारण मीच या मार्गाची निवड केली आहे. मी मुक्तपणे बोलणार आणि समस्यांवर माझी मते मांडणार, याचा निर्णय मी स्वत: घेतला आहे. मी मौन राहणे निवडू शकले असते. ‘पद्मावत’ चित्रपटातील जोहर सीनबाबत मला खुले पत्र लिहिण्याची काहीच गरज नव्हती, असे स्वरा म्हणाली.

मोकळेपणे व्यक्त होण्याचा मार्ग निवडण्याविषयी ती पुढे म्हणाली, “तुम्ही माझ्याबद्दल अनेक तक्रारी करू शकता. मला पसंत किंवा नापसंत करू शकता. मला असे वाटते की, जे लोक माझा द्वेष किंवा तिरस्कार करतात, तेसुद्धा असे बोलू शकणार नाहीत की ही खोटारडी आहे किंवा फेक आहे. मी खऱ्या आयुष्यात जी व्यक्ती नाही तसे दाखवण्याचा प्रयत्न करते, असे ते बोलूच शकणार नाहीत. लोकांशी माझ्या संवादानुसार माझी मते बदलत नाहीत. मी प्रत्येकाशी एकसारखीच वागते. जर मी हे सगळे बोलू शकले नसती तर गुदमरून मेले असते.

युद्धात मी माझ्यावर गोळी झेलायलाही तयार आहे, असे तुम्ही म्हणू शकता. पण जेव्हा प्रत्यक्षात तुम्हाला ती गोळी लागते, तेव्हा खरेच वेदना होतात. त्यामुळे मी जी मते मांडली, त्याचे मला परिणामसुद्धा भोगावे लागले. माझी मुलगी राबियाच्या जन्माआधी, अभिनय हे माझे सर्वांत मोठे प्रेम होते. मला अभिनय करायला खूप आवडायचे. मला विविध भूमिका साकारायच्या होत्या. पण मला तेवढ्या संधी मिळाल्या नाहीत. मला प्रोजेक्ट्स न मिळाल्याची आर्थिक आणि भावनिक किंमतसुद्धा मोजावी लागली. यात प्रतिष्ठेबद्दलची चिंतासुद्धा होती. मला वादग्रस्त अभिनेत्रीचा टॅग मिळाला.

दिग्दर्शक, निर्माते, वितरक माझ्याबद्दल वाईट बोलू लागले. तुम्ही एक प्रतिमा बनवली जाते. या गोष्टींचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही, अशी गोष्ट नाही. मला फरक पडत नाही, असे दाखवण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी मला त्रास होतोच. जी गोष्ट मला सर्वाधिक आवडते, ती करायला मिळत नसल्याचे खूप वाईट वाटते,  अशा शब्दांत स्वराने तिच्या भावना व्यक्त केल्या.

स्वरा ‘जहा चार यार’ या चित्रपटात शेवटची झळकली. हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉयफ्रेंड फहाद अहमदची (आता पती) काय प्रतिक्रिया होती, याविषयी तिने सांगितले. ती म्हणाली, “तो चित्रपट फार चालला नव्हता, पण मी फार मेहनत घेतली होती. कारण ती भूमिका माझ्या स्वभावाच्या विरोधातली होती. स्क्रिनिंगनंतर तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तू खरेच खूप मोठा त्याग केला आहेस, तुला मानावे लागेल. तू इतकी चांगली अभिनेत्री आहेस, तुला आणखी काम करायला हवे. आता तू गप्प राहा आणि चित्रपटात काम कर. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. चित्रपटात काम करायला न मिळाल्याचे दु:ख मी माझ्या आईवडिलांसमोरही व्यक्त करत नाही. माझा भाऊ त्याविषयी थोडेफार समजून घेतो पण आम्ही फारसे बोलत नाही. आता कुठे मुलीच्या जन्मानंतर मी त्याविषयी मोकळेपणे बोलू लागले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story