अभिनेता प्रसाद ओक
मला मुंबईत येऊन २५ ते २८ वर्षे झाली आहेत. भाड्याच्या छोट्या घरात सुरुवातीला आम्ही राहायचो. मग लग्न झाले, बायको आली. मुले झाली. हळुहळू आम्ही कालांतराने स्वत:चे घर घेतले. लोकांना वाटते कोट्यातून मला घर मिळाले आहे, अशा शब्दांत अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या घराची गोष्ट सांगितली आहे. प्रसाद म्हणाला की, मी काम करायला सुरुवात केली, तेव्हा फक्त नाटक होते. चॅनेल्स वगैरे नव्हते.
ही जवळपास १९९६-९७ ची गोष्ट आहे. मुंबईतल्या पहिल्या नाटकासाठी मला ६० रुपये नाइट होती. या कमाईत मी अंधेरीत घर घ्यायचे स्वप्न पाहूच शकत नव्हतो. त्या पहिल्या नाटकापासून आजपर्यंत मी खूप मोठा प्रवास केला. ९० च्या वर मालिका केल्या. शंभरच्यावर चित्रपट केले. माझी मुले मोठी झाली. त्यांचा एक प्रवास सुरू झाला. मग, माझ्या लक्षात आले मी माझ्या बायकोचे घराचे स्वप्न आता पूर्ण करायला हवे.
त्याचवेळी ‘धर्मवीर’ चित्रपटाची ऑफर आली. माझा लूक वगैरे फायनल झाला. एकनाथ शिंदे ट्रेलर लॉन्चला आले होते. त्यामुळे लोकांना असे वाटू लागले मी त्यांच्या खूप जवळचा आहे. पण, या ३ वर्षांच्या प्रवासात ते माझ्याशी फक्त दोन ते तीन वेळा बोलले आहेत. त्यांचा या सगळ्यात काहीच सहभाग नाही.
प्रसादने पुढे सांगितले की, मी २५-२८ वर्षे राबून, घासून, मेहनतीने थोडी-थोडी पुंजी बाजूला काढून माझ्या बायकोचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी झटलो. मी तिच्या आनंदासाठी अंधेरीत मोठे घर घेतले आणि लोक म्हणायला लागले हे शासकीय कोट्यातून मिळाले आहे. तुम्हाला धक्का बसेल…ज्यांना मी या इंडस्ट्रीत जवळचे मित्र मानतो त्यांनीच असे पसरवले आहे.
अरे मी लाचार नाही…मला स्वाभिमान आहे. मला असे कुणी दिलेले घर नको आहे. ते माझ्या स्वत:च्या कमाईचे घर आहे आणि ही गोष्ट मी कागदोपत्री सिद्ध करू शकतो. या ट्रोलर्सकडे मी लक्ष देत नाही कारण, ते माझे घर चालवायला येत नाहीत. आम्ही नव्या घराची वास्तुशांती ठेवली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे आमच्या घरी रात्री ११ वाजता वास्तुशांतीला आले होते.
तेच फोटो मी पोस्ट केले आणि त्यावरून लोकांनी चर्चा केल्या. पण, असे काहीच नाही. त्यामुळे या फालतू ट्रोलर्सकडे मी लक्ष देत नाही, असेही प्रसाद ओकने म्हटले आहे. feedback@civicmirror.in