छाया कदम
कान आंतरराष्ट्रीय महोत्सवात छाया कदम यांच्या भूमिका असलेले ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ व ‘सिस्टर मिडनाईट’ असे दोन चित्रपट दाखविण्यात आले होते. पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वांनी उभे राहून दाद दिल्याचे पाहायला मिळाले.
नुकतीच त्यांनी ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मला माझ्या दिसण्याविषयी असे कधीच प्रश्न पडले नाहीत. कारण- ‘झुलवा’ माझे जे पहिले नाटक होते. त्या नाटकात काम करणारे कलाकार सगळे माझ्यासारखे दिसणारेच होते. वामन केंद्रे सरांनी फक्त आमची प्रतिभा पाहिली होती. त्या गावातील माणसे जशी दिसतील, त्यांची जशी शरीरयष्टी आहे. त्यांना तशीच माणसे हवी होती. त्या रिहर्सलमध्ये, सरांच्या वर्कशॉपमध्ये किंवा त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जी माणसे जोडली गेली, त्यांच्याबरोबर राहून मला माझ्या दिसण्याविषयी प्रश्न पडले नाहीत.
छाया कदम स्वत:विषयी अधिक स्पष्ट करताना म्हणाल्या की, मला असे कधी वाटले नाही की, थोडेसे गोरे असायला पाहिजे होते किंवा थोडेसे पोट आत पाहिजे होते. माझे आधीपासून ठरलेले की, मला माणसांची गोष्ट सांगायची आहे आणि त्यामुळे माणूस दिसणे महत्त्वाचे आहे. माझ्या जवळचे जे दिग्दर्शक आहेत, ते मला हेच सांगतात की, छाया तू आहे तशीच राहा.
त्याच्यात काहीतरी पात्र दिसते. कारण- सगळ्याच बारीक असतील, तर सगळ्याच सारख्या दिसतात, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे मला हा माझा प्लस पॉइंट वाटतो की, मी अशी दिसते. मला भारी वाटते की, मी सावळी आहे. आपली इंडस्ट्री सौंदर्याभोवती फिरणारी आहे. याबरोबरच ज्या इतर क्षेत्रांतील अनेक मुली कलाकारांना बघतात, त्यावेळी त्यांना वाटते की, आपण यांच्यासारखे दिसले पाहिजे.
प्रत्येकाने आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारले पाहिजे. स्वत:वर प्रेम करता आले पाहिजे. जर तुम्हाला इंडस्ट्रीत स्वत:वर काम करायचे आहे. वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत. तर तुम्ही या गोष्टी अभ्यास म्हणून करा. जर मला अशी एखादी भूमिका आली की, ग्लॅमरस दिसायचे आहे.
मी त्यावेळी विचार करेन. दीपिका पदुकोण, आलिया भट्ट व इतर अभिनेत्री कशा वर्कआऊट करतात किंवा आपल्या दिसण्यावर लक्ष देतात हे मी डोळ्यांसमोर ठेवेन; पण प्रत्येक वेळी मी तशी तयार होऊन वगैरे निघेन, असे होणार नाही. दरम्यान, ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील छाया कदम यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.
feedback@civicmirror.in