संग्रहित छायाचित्र
अलीकडेच ‘आयसी - ८१४ कंदहार हायजॅक’ या वेबसिरीजच्या प्रदर्शनामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री पत्रलेखा हिने 'राजकुमार रावची पत्नी' या टॅग सोडवून स्वतःची ओळख निर्माण करायची असल्याचे सांगितले.
पत्रलेखाने इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावण्यासाठी कराव्या लागत असलेल्या संघर्षाचा उल्लेख केला. पत्रलेखाने खुलासा केला की तिला अनेकदा 'राजकुमार रावची पत्नी' या टॅगसह प्रोजेक्ट ऑफर केले जातात. ती म्हणाली, ‘‘मला या टॅगमुळे खूप त्रास होतो. मी माझी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. राजकुमार माझा नवरा आहे. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. पण त्याच्या खांद्यावर बसून मला माझे नाव कमवायचे नाही. मी माझे मूळ गाव शिलाँग सोडले. कारण मला माझ्या वडिलांच्या खांद्यावर बसूनही नाव कमवायचे नव्हते.’’
फेमिनिझमचा मुद्दा असो वा नसो, पण मला या टॅगचा त्रास आहे, मी या टॅगपासून दूर पळते. नाहीतर मी खूप प्रोजेक्ट करू शकेन, बरोबर? पण त्याच्या खांद्यावर बसून मला माझे नाव कमवायचे नाही, असे सांगताना चित्रलेखाला होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
पत्रलेखा आणि राजकुमारचं व्यक्तिमत्त्व वेगळं आहे का, असं विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘आमची व्यक्तिमत्त्वं वेगळी आहेत. पण आम्ही खूप समानही आहोत. शेवटच्या वेळी आम्ही कधी भांडलो, ते मला आठवत नाही. आम्ही भांडत नाही. पण आमची मते भिन्न आहेत, परंतु आम्ही इतकी वर्षे एकत्र आहोत की आता एक समान आहोत. त्याला काय आवडत नाही, हे मला समजते आणि मी त्याबद्दल बोलत नाही. आमच्या सीमाही चांगल्या ठरल्या आहेत. आम्हा दोघांनाही चित्रपटांची खूप आवड आहे. दररोज एक चित्रपट पाहू शकतो. मला एकत्र मालिका पाहण्याची खूप आवड आहे. आम्हाला प्रवासाचीही खूप आवड आहे.’’
राजकुमार त्याच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलतो का, असे विचारले असता पत्रलेखा म्हणाली, ‘‘असे अनेकदा होत नाही. कारण कधी कधी पटकथा इतकी चांगली असते किंवा दिग्दर्शक असे असतात की त्यांच्यासोबत काहीही न बोलता किंवा चर्चा न करता काम करावे लागते. जेव्हा जेव्हा कोंडी होते तेव्हा आम्ही नक्कीच चर्चा करतो. आम्ही एकाच उद्योगातून आहोत याचा आनंद आहे.’’
तू आणि राजकुमार एकत्र दिसणार का, या प्रश्नाच्या उत्तरात पत्रलेखा म्हणाली, ‘‘या आयुष्यात नक्की करेन. आम्ही आणखी एक चित्रपट करू, पण कधी ते माहीत नाही. अद्याप इतके चांगले काहीही आलेले नाही. मला आशा आहे की जे ऐकत आहेत ते आमच्यासाठी काहीतरी लिहतील. पण हो, आम्ही चित्रपट नक्की करू. अनेक चित्रपट निर्माते आमच्याकडे येतात, पण कथा योग्य नाहीत किंवा दिग्दर्शक योग्य नाहीत. नुसती हेडलाईन किंवा प्रोजेक्ट बनवण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज नाही. आम्हाला रिलेशनशिप ड्रामा आवडतो. मला संधी मिळाली तर मला या विषयावर काम करायला आवडेल.’’
कधी फक्त पैशासाठी कुठलाही प्रोजेक्ट साइन केला का, या प्रश्नावर पत्रलेखाने प्रामाणिक उत्तर दिले. ‘‘हो, नक्कीच केले. मला मुंबईत टिकायचे असेल तर मला चित्रपट करावे लागतील. एक काळ असा होता की माझा बँक बॅलन्स शून्य झाला होता, पण त्या वाईट काळातही मी कशीतरी टिकून राहिली. त्यावेळी मला खूप क्लासेस करायचे होते, पण आई-वडिलांकडून किती पैसे घ्यायचे? ते कधीच नाही म्हणणार नसले तरी अपराधी वाटतं ना? मुंबई खूप महाग आहे. मात्र, मी नशीबवान होते की माझ्या आई-वडिलांचे घर ओशिवरा येथे होते. मी खूप संरक्षित होते. जर तुमच्याकडे अन्न आणि निवारा असेल तर मुंबई खूप सुरक्षित आहे. माझ्याकडे ती सुरक्षा होती. यामुळे मला त्यासाठी संघर्ष करावा लागला नाही, हे आवर्जून सांगायला हवे,’’ असे ती म्हणाली.