फॅमिली प्लानिंगवर बोलू काही...सोनाक्षी म्हणते आम्हा दोघांनाही...
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने यावर्षी २३ जून रोजी झहीर इक्बालसोबत लग्न केले. नुकतेच एका मुलाखतीत सोनाक्षी आणि झहीरने कुटुंब नियोजनाविषयी सांगितले. (Sonakshi Sinha)
दोघेही म्हणाले, ‘‘सध्या आम्ही दोघेही आमच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यात व्यस्त आहोत. आम्हा दोघांनाही मुलं आवडतात. पण सध्या मुलाचा विचार नाही. भविष्यात जेव्हाही आम्हाला मूल होईल तेव्हा आपलं आयुष्य फक्त त्याच्याभोवतीच फिरेल. सध्या एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहोत.’’
सोनाक्षीने झहीरसोबत लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर पालकांच्या प्रतिक्रयेबाबत माहिती दिली. ‘‘माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना आमच्या नात्याबद्दल अनेक वर्षांपासून माहिती आहे. माझे वडील खूप खुश झाले. त्यांना झहीर आवडतो. पप्पांचा वाढदिवस ९ डिसेंबरला आणि झहीरचा वाढदिवस १० डिसेंबरला आहे, त्यामुळे दोन्ही सारखेच आहेत आईही झहीरला ओळखत होती. मी पहिल्यांदा तिलाच याबद्दल सांगितले. माझ्या आई-वडिलांनी स्वतः प्रेमविवाह केला होता, त्यामुळे भविष्यात आमचे नाते कसे असेल हे त्यांना माहीत होते,’’ असे सोनाक्षीने सांगितले.
सोनाक्षी आणि झहीर यांनी २३ जून रोजी हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न न करता नोंदणीकृत विवाह केला होता. यानंतर, त्यांनी मुंबईतील बास्टन रेस्टॉरंटमध्ये लग्नाचे रिसेप्शन दिले. यामध्ये सलमान खान, रेखा, काजोलसह फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. सोनाक्षी लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारणार का, अशी चर्चा होती. लोकांच्या या प्रश्नाला झहीरचे वडील इक्बाल रत्नासी यांनी उत्तर दिले होते. सोनाक्षी लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते.