संग्रहित छायाचित्र
गोविंदाने ‘हिरो नंबर १’ सिनेमातील एक गाणे फक्त १५-२० मिनिटांत शूट केल्याचा किस्सा अभिषेक बॅनर्जीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितला आहे. गोविंदा हा १९९० च्या दशकातील सुपरस्टार होता. त्याचे नृत्यकौशल्य, विनोदाचे टायमिंग, आणि भावनिक डायलॉग्स म्हणायची त्याची खास शैली आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. ‘बीबी नंबर १’, ‘कुली नंबर १’, ‘राजा बाबू’, ‘क्यूँकी मैं झूठ नहीं बोलता’ या सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांनी गोविंदाने चाहत्यांवर अधिराज्य गाजवले.
तो इतका व्यस्त असायचा की दिवसाला दोन शिफ्टमध्ये तरी काम करायचा, असे गोविंदाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. गोविंदा १९९० च्या दशकात उशिरा सेटवर येण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याच्या अनेक सहकलाकारांनी या सवयीबद्दल उघडपणे सांगितले आहे. परंतु, काम करण्याचा वेग आणि सेटवर असताना त्याचे असामान्य कौशल्य, कामाप्रती समर्पण यावर फार कमी लोकांनी चर्चा केली आहे. एका अलीकडच्या मुलाखतीत अभिषेक बॅनर्जीने गोविंदाबद्दलचा असाच एक किस्सा शेअर केला, जो दिग्दर्शक डेविड धवनने त्याला सांगितला होता. अभिषेकने सांगितले की, गोविंदा इतका ‘जीनियस’ होता की तो १२ तासांचे काम फक्त दोन तासांत पूर्ण करू शकत असे.
डेविड धवन पॅरिसमध्ये आयफेल टॉवरजवळ गाण्याचे शूट करत होते. त्यांना तिथे एक सीन शूट करायचा होता. कदाचित ते ‘हिरो नं १’ चित्रपटाचे शूटिंग असावे. त्यांना चित्रीकरणाची परवानगी मिळाली नव्हती आणि वेळहे कमी होता. तेव्हा गोविंदाने फक्त १५-२० मिनिटांत संपूर्ण गाणे त्याच्या सगळ्या ग्रुपबरोबर शूट केले त्यानंतर ते तिथून निघून गेले. करिश्मा कपूरही गोविंदाबरोबर त्या गाण्याच्या सीक्वेन्सचा भाग होती. आज असे करणे शक्य नाही. आज कोणाला असे काम करता येईल असे मला वाटत नाही. एवढा प्रोफेशनॅलिझम कोणाकडे असेल असे मला वाटत नाही, असेही बॅनर्जी म्हणाला. feedback@civicmirror.in