Life : आयुष्याच्या प्रवासात रिटर्नट्रेन नाहीच

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ ला ओळखले जाते. या विनोदी मालिकेतून अनेक कलाकार घराघरांत पोहोचले. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. उत्तम अभिनय व त्याला विनोदाची अचूक जोड या जोरावर कुशलने कलाविश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. नुकतेच कुशलने ट्रेन आणि स्टेशन याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Tue, 9 May 2023
  • 04:22 pm

आयुष्याच्या प्रवासात रिटर्नट्रेन नाहीच

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ ला ओळखले जाते. या विनोदी मालिकेतून अनेक कलाकार घराघरांत पोहोचले. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेला ओळखले जाते. उत्तम अभिनय व त्याला विनोदाची अचूक जोड या जोरावर कुशलने कलाविश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. नुकतेच कुशलने ट्रेन आणि स्टेशन याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल कायमच चाहत्यांना माहिती देत असतो. नुकताच कुशलने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत कुशल एका ठिकाणी शांतपणे बसून विचारत मग्न असल्याचे दिसत आहे. याला त्याने हटके कॅप्शन दिली आहे.

“स्ट्रगल काळातल्या ट्रेनच्या प्रवासात, कधीकधी चुकून डुलकी लागायची, थोड्या वेळाने डोळे उघडले की, आजूबाजूला वेगळीच माणसं दिसायची, खिडकीतून बाहेर डोकावलं, तर वेगळेच रस्ते, वेगळ्याच बिल्डिंग आणि मग लक्षात यायचं की, सालं आपण उतरायचं ”स्टेशन” तर मागेच गेलं ! मग पुढल्या एखाद्या अनोळखी स्टेशनला उतरायचं, अनोळखी पाट्या, अनोळखे स्टॉल्स, अनोळखी माणसं. पण इंडिकेटर वरची “रिटर्न ट्रेन” मिळेपर्यंत, सगळं ओळखीचं होऊन जायचं. आयुष्याचा प्रवासही थोड्याफार फरकाने असाच असतो, नाही का? आपण थांबायचं ठिकाण चुकलं की, मग एका अनोळखी जगाचा प्रवास सुरू होतो. फक्त आयुष्याच्या प्रवासात कोणत्याच इंडिकेटरला रिटर्न ट्रेन नसते. आपलं उतरायचं स्टेशन आणि माणसं एकदा चुकली, की चुकली…(सुकून)”, असे कुशलने म्हटले आहे. कुशलची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. सध्या तो एका चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनला गेला आहे. त्याचे अनेक फोटोही त्याने पोस्ट केले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story