संग्रहित छायाचित्र
टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक आणि निर्माता भूषणकुमार यांनी घोषणा केली आहे की, ‘भूलभुलैया ३’ हा चित्रपट या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर १ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत आहेत.
विशेष म्हणजे ‘सिंघम अगेन’ हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये अक्षयकुमार, करिना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत.
आता या संघर्षात कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘सिंघम अगेन’ या चित्रपटासोबत होणाऱ्या संघर्षावर बोलायचे भूषणकुमार यांनी टाळले. 'विक्की और विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी भूषण यांनी 'भूलभुलैया ३' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उघड केली. ‘‘आपण फक्त विक्की विद्याच्या ट्रेलरबद्दल बोलणार आहोत. मी एवढेच सांगेन की, 'भूलभुलैया ३' हा चित्रपट १ नोव्हेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. विक्की विद्याचा दुसरा भागही आम्ही बनवू,’’ असे ते म्हणाले.
काही काळापूर्वी कार्तिक आर्यनने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत संकेत दिले होते. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर त्याने एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले होते, ‘‘या दिवाळीला भेटू या.’’
याआधी 'भूलभुलैया' या फ्रँचायझीचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अक्षय कुमार, शायनी आहुजा, राजपाल यादव, परेश रावल आणि विद्या बालन सारखे कलाकार २००७ मध्ये रिलीज झालेल्या 'भूलभुलैया'मध्ये दिसले होते. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटाने ८३ कोटींचा व्यवसाय केला. हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा आठवा चित्रपट होता.
यानंतर २०२२ मध्ये दुसरा भाग 'भूलभुलैया २' रिलीज झाला. या चित्रपटाने जगभरात २६६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या चित्रपटात अक्षयची जागा कार्तिक आर्यनने घेतली होती. अनीस बज्मी यांनी याचे दिग्दर्शन केले होते. कार्तिक व्यतिरिक्त कियारा अडवाणीसारखी कलाकार मुख्य भूमिकेत होती.