‘धर्मवीर २’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली!

काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र, हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर केलेली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘धर्मवीर २’ सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 2 Jul 2024
  • 02:57 pm
Entertainment news,  'Dharmaveer 2', movie release, new movie , anand dighe

संग्रहित छायाचित्र

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. मात्र, हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर केलेली नव्हती. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘धर्मवीर २’ सिनेमाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या समोर आले आहे.

पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. त्याच्या लूकने आणि ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  ‘धर्मवीर २’ सिनेमाचे  हे नवीन पोस्टर लॉंच करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मंगेश देसाई यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे, ‘धर्मवीर २’ हा सिनेमा यंदा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, संपूर्ण जगभरात हा सिनेमा दाखवला जाणार आहे.

पहिल्या भागात आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचे निधन झाल्याचेही दाखवण्यात आले होते. त्यामुळे आता या चित्रपटाच्या पुढील भागात नेमके काय दाखवले जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.  ‘धर्मवीर २’ हा बहुचर्चित चित्रपट क्रांतिदिनी म्हणजे ९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरवरचे “आपले अस्तित्व… फक्त हिंदुत्व!”, “साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…”, “हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” असे काही संवाद सर्वांचे लक्ष वेधून घेतात. साधारण दोन वर्षांपूर्वी ३० जूनलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या निमित्ताने कलाकारांकडून मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story