संग्रहित छायाचित्र
बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री ईशा कोपिकरचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घटस्फोट झाला. पती रोहित उर्फ टिम्मी नारंग आणि ईशा १४ वर्षाच्या सहजीवनानंतर एकमेकांपासून विभक्त झाले. त्यानंतर ईशा आपली मुलगी रियाना सोबत वेगळी राहू लागली. नुकतीच एका मुलाखतीत ईशाने घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.
एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली की तिच्या मनात खूप भीती होती. नवी सुरुवात कशी करायची हे तिला माहिती नव्हते. १० वर्षाच्या मुलीसोबत टी एका वेगळ्या परिस्थितीत प्रवेश करत होती. रियाना एका सोयीसुविधांनी भरलेल्या घरात वाढली होती. तिला चांगले जीवन द्यायचे होते. ईशा म्हणाली की तिला विश्वास होता की सगळं काही ठीक होईल.
ईशा पुढे म्हणाली, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून काहीही अपेक्षा ठेवत नसता तेव्हा नातं अजून मजबूत बनत. तिने रोहितच्या घराजवळच घर घेतले. तो मुलगी रियानाला नेहमी भेटायला येतो. ते दोघे तिच्याशी आई-वडिलांप्रमाणेच व्यवहार करतात. त्यांच्यात चांगली मैत्री आहे असे ईशाने सांगितले.
घटस्फोटाचे कारण विचारल्यावर ईशाने सांगितले की एक ठराविक कारण नव्हते. आम्ही हळूहळू एकमेकांपासून दूर होत गेलो. त्यामुळे रोहितने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला,तिने तो निर्णय मान्य केला. एकमेकांचे आयुष्य असह्य करणे सोपे असते. मात्र योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असते. आमच्या विकासासाठी हे महत्त्वाचे होते. जगा आणि जगू द्या या तत्त्वावर विश्वास असल्याचे ईशाने सांगितले.