सईचा बॉलिवूड सिनेमा

मराठीत अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर आता सई ताम्हणकर हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. मिमि, हंटर, लव्ह सोनिया अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे, तर अलीकडेच ती नागराज मंजुळे यांच्या 'मटका किंग' या सिनेमात दिसणार आहे

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 26 Jun 2024
  • 01:37 pm
Entertainment news, Sai Tamhankar

संग्रहित छायाचित्र

मराठीत अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर आता सई ताम्हणकर (Sai Tamhankar0 हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. मिमि, हंटर, लव्ह सोनिया अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे, तर अलीकडेच ती नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या 'मटका किंग' या सिनेमात दिसणार आहे. सईने बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आणि अनिल कपूर यांच्यासोबतही काम केले आहे. बोल्ड, ग्लॅमरस आणि बिनधास्त अशी ओळख असलेल्या सई ताम्हणकरने सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूप स्ट्रगल केला होता. 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून सईने सिनेक्षेत्रात करिअरची सुरुवात केली. छोट्या पडद्यावरून लोकप्रियता मिळाल्यानंतर सईने चित्रपटात नशीब आजमावले. चित्रपटात मुख्य भूमिका मिळण्याआधी सईने अनेक छोट्या-छोट्या भूमिकादेखील केल्या आहेत. बॉलिवूडमध्येही सईने आपले स्थान मजबूत केले आहे. अनिल कपूरचा 'ब्लॅक अँड व्हाइट' हा सिनेमा सईचा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. २००८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सईने एक छोटीशी भूमिका साकारली आहे. ब्लॉक अँड व्हाइट या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासोबतच शेफाली शहा, अनुराग सिन्हा, आदिती शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, सईने या चित्रपटात 'निम्मो' ही भूमिका साकारली आहे. सुभाष घई यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ब्लॅक अँड व्हाइटमध्ये सईची छोटीशी भूमिका असली तरी तिने खूप छान पद्धतीने वठवली आहे.

आमिर खानच्या गजनी चित्रपटातही सईने भूमिका साकारली होती. सिनेमात तिने सुनीता (जिया खान) च्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. चित्रपटात जिया खान हिने एका मेडिकल विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. जिया खानला नेहमी सपोर्ट करणाऱ्या खऱ्या मैत्रिणीची भूमिका सईने साकारली होती.  मात्र सईला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली ती २०१५ मध्ये आलेल्या 'हंटर' चित्रपटामुळे.  गुलशन देविहा आणि राधिका आपटे यांच्यासोबत सईची भूमिकाही महत्त्वपूर्ण होती. ज्योत्स्ना सुर्वे ही भूमिका सईने साकारली होती. त्याचबरोबर २०१८ मध्ये आलेल्या लव्ह सोनिया या चित्रपटात सईने अनुपम खैर यांच्यासोबतही काम केले होते. त्याचबरोबर २०२१ मध्ये आलेल्या क्रिती सॅनोनसोबतच्या मिमि चित्रपटाही ती झळकली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story