File Photo
भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये "आमचा सुंदर आशीर्वाद लवकरच येत आहे. २०२५" असं लिहिलं आहे. सोबतच चिमुकल्या बाळाच्या पावलांची प्रतिमा देखील आहे. चाहत्यांना त्यांच्या बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. सोबतच य बातमीमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाला दीड वर्षे झाली. जानेवारी २०२३ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. अथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. लग्नाच्या दीड वर्षांनंतर हे जोडपं आपल्या बाळाचं स्वागत करायला आतुर झालं आहे. अथिया आणि राहुलच्या या गोड बातमीमुळे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अलीकडेच दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, रिचा चढ्ढा-अली फजलसारख्या सेलिब्रिटी जोडप्यांनी देखील त्यांच्या बाळाचं स्वागत केलं आहे.
२०१९ मध्ये अथिया आणि राहुल यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली. काही वर्षे त्यांनी डेटिंग केले. त्यानंतर २०२३ च्या सुरुवातीला त्यांनी खाजगी समारंभात खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवर लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. अथिया ने दिलेल्या या गोड बातमीमुळे शेट्टी कुटुंबासह चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.
त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते २०२५ मध्ये त्यांच्या बाळाला जन्म देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी एका शोमध्ये सुनील शेट्टीने तो आजोबा होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता स्वत: अथिया आणि केएल राहुल यांनीच ते आई-बाबा होणार असल्याचे जाहीर केले आहे.