कंगनाची नवी इनिंग! भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार
कायम वाद ओढवून घेणारी मात्र, अभिनयाच्या बाबतीत ‘क्वीन’ असलेली बाॅलिवूडमधील (Bollywood) उल्लेखनीय व्यक्तिमत्व कंगना रणौत (Kangana Ranaut)आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहे. आतापर्यंत पडद्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जलललिता यांची पात्रे साकारणारी महत्वाकांक्षी कंगना आता प्रत्यक्षात राजकारणात उतरणार आहे. ती पुढील वर्षी भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.
खुद्द कंगनाचे वडील अमरदीप रणौत यांनीच याबाबत माहिती दिली. कंगनासाठी २०२४ हे वर्ष फार खास असणार आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कन स्थान निर्माण केल्यानंतर कंगनाचा प्रवास राजकारणाच्या दिशेने वळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कंगनाचे चाहते ती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा दावा करीत होते. आपली लाडकी कंगना खासदार व्हावी, अशी इच्छा त्यांची होती. ती वास्तवात उतरवण्याच्या दिशेने कंगनाची पावले पडत आहेत.
कंगना भाजकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं तिच्या वडिलांनी स्पष्ट केले असले तरी नेमक्या कोणत्या मतदारसंघातून, हे अद्याप ठरलेले नाही. अमरदीप रणौत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. पण कंगना कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवेल, हे अद्याप पक्षाने ठरवलेले नाही.
काही दिवसांपूर्वी कंगनाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची कुल्लूमधील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. तेव्हापासून कंगना भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर कंगनाच्या वडिलांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
‘तेजस’ सिनेमानंतर कंगना ‘इमरजन्सी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा सुरुवातीला यंदा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता तो २०२४ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे कळते. या सिनेमात कंगनासोबत, श्रेयस तळपदे, अनुपम खेर, सतीश कौशिक आणि महिमा चौधरी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
मंडी की चंडीगड?
कंगना ही सोशल मीडियावर तसेच जाहीर कार्यक्रमांमध्ये कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत असते. सोशल मीडियावर ती भाजपच्या समर्थनार्थ अनेकदा आक्रमकपणे व्यक्त होत असते. याचबरोबर भाजपच्या विचारधारेशी सुसंगत पण विवादास्पद विधाने करीत तिने अनेक वाद ओढवून घेतले आहेत. शिवाय हिमाचल प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमातदेखील कंगना उपस्थित होती. ही वाटचाल पाहता कंगना भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळाले होते. भाजपमधील सुत्रांच्या मते, कंगना मंडी किंवा चंडीगड यापैकी एका लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपचे नेतृत्व तसेच कंगनानेदेखील अजूनपर्यंत या विषयावर वक्तव्य केलेले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.