John Abraham : जॉन अब्राहमने घेतला साखरेशी पंगा

बाॅलिवूडमधील (Bollywood) सध्याच्या मॅचो मॅनच्या गर्दीतील उल्लेखनीय नाव म्हणजे जाॅन अब्राहम (John Abraham) दीर्घ काळ संघर्ष करीत जाॅनने बाॅलिवूडमध्ये स्वत:ला प्रस्थापित केले आहे.

John Abraham

जॉन अब्राहमने घेतला साखरेशी पंगा

बाॅलिवूडमधील (Bollywood)  सध्याच्या मॅचो मॅनच्या गर्दीतील उल्लेखनीय नाव म्हणजे जाॅन अब्राहम (John Abraham) दीर्घ काळ संघर्ष करीत जाॅनने बाॅलिवूडमध्ये स्वत:ला प्रस्थापित केले आहे. माॅडेल, अभिनेताच नव्हे तर यशस्वी निर्माता म्हणूनदेखील जाॅनने आपला ठसा उमटवला आहे. अशा या जाॅनने रविवारी (१७) वयाची ५१ वर्षे पूर्ण केली. आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी गेली २८ वर्षे तो साखरेविना राहिला आहे. या एका वाक्यावरून जाॅनच्या पिळदार शरीरयष्टीचे रहस्य आणि साखरेसोबतचे त्याचे शत्रुत्व लक्षात येईल.  

जॉनसाठी हे वर्ष चांगले गेले. 'पठाण' चित्रपटातील त्याच्या नकारात्मक भूमिकेचे खूप कौतुक झाले.  या चित्रपटाने १,१०० कोटी रुपयांच्या घरात बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. या चित्रपटाने जॉनला बॉलिवूडमधील मोठा ॲक्शन स्टार बनवले आहे.

जॉन त्याच्या फिटनेसबद्दल इतका जागरूक आहे की, तो दिवसाचे अनेक तास जिममध्ये घालवतो. त्‍याच्‍या शरीराला शारीरिक ठेवण्‍यासाठी तो काटेकोर डाएटही फॉलो करतो. मागील वर्षी जॉनने शिल्पा शेट्टीच्या रेडिओ शो 'शेप ऑफ यू' मध्ये सांगितले होते की, त्याने २७ वर्षांपासून साखर खाल्ली नाही. साखर धूम्रपानापेक्षा जास्त धोकादायक असल्याचा जाॅनचा दावा आहे. साहजिकच तो साखरेला विष मानतो. तो कोल्ड्रिंक्स आणि अल्कोहोलपासूनही दूर राहतो.

जॉनने चित्रपटसृष्टीत यश मिळवण्यासाठी बराच काळ संघर्ष केला आहे. मॉडेलिंगपासून सुरुवात केली आणि त्यानंतर अभिनयाकडे वाटचाल केली, पण बराच काळ टीकेला सामोरे जावे लागले. अनेकजण त्याला तोंडावर म्हणायचे, ‘‘तुला अभिनय करता येणार नाही. बाॅलिवूड सोडून दे,’’ मात्र जॉनने हार मानली नाही आणि ॲक्शन स्टार आणि यशस्वी निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.

जॉनने त्याच्या २० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत चार फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. त्याच्या निर्मित 'विकी डोनर' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. उत्पन्न आणि लोकप्रियतेच्या आधारावर जॉनने २०१७ मध्ये फोर्ब्स इंडियाच्या ‘टॉप हंड्रेड’ सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळवले आहे.

 ‘जिस्म’ हा पदार्पणातील चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर जाॅनचे अनेक चित्रपट फ्लाॅप गेले.  इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी तो हिट चित्रपटाच्या शोधात होता. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धूम' चित्रपटातून त्याला हे यश मिळाले. या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेत जॉनला खूप पसंत केले गेले आणि यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. 'धूम' हा २००४ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. यानंतर जॉनने  'गरम मसाला', 'काल', 'जिंदा', 'बाबुल', 'काबुल एक्सप्रेस' सारखे चित्रपट केले. करण जोहरच्या प्रोडक्शनमधील 'दोस्ताना' हा चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटाने ९० कोटींच्या घरात कमाई केली.

चित्रपटांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानंतर जॉनने निर्माता म्हणून नशीब आजमावले. २०१२ मध्ये त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले आणि आयुष्मान खुराना आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेला 'विकी डोनर' चित्रपट तयार केला. चित्रपटाला यश मिळाले. या चित्रपटाला होलिस्टिक एंटरटेनमेंटमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. यानंतर जॉनने 'मद्रास कॅफे' ची निर्मिती केली ज्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली.

 'पठाण' मध्ये बऱ्याच दिवसांनी जॉन एका चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसला. या चित्रपटात शाहरुख आणि त्याच्यामध्ये पॉवर पॅक्ड ॲक्शन पाहायला मिळाली. यासाठी त्याला २० कोटी रुपये फी देण्यात आली होती. यापूर्वी यशराजच्या 'धूम' चित्रपटातही जॉन खलनायक बनला होता. याशिवाय 'रेस टू' मधील खलनायकाच्या भूमिकेतही त्याला पसंत केले गेले.

चित्रपटांव्यतिरिक्त जॉनच्या वैयक्तिक आयुष्याचीही बरीच चर्चा झाली आहे. मात्र, आता तो याबाबत न बोलणे पसंत करतो. जॉन एकेकाळी हाॅट बिपाशा बसूसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होता. ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही होते, पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांच्या विभक्त होण्याचे कोणतेही ठोस कारण समोर आले नाही, परंतु असे म्हटले जाते की बिपाशा या नात्याचे लग्नात रूपांतर करण्यासाठी दबाव आणत होती तर जॉनला त्यावेळी ते नको होते. नंतर बिपाशाने करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले. जॉनने २०१४ मध्ये एनआरआय प्रिया रुंचालशी लग्न केले, ती बँकर आहे.  

 अमिताभ बच्चन यांच्या ‘केबीसी’ मध्ये जॉनने सांगितले होते की, त्याच्याकडे एकूण १८ बाइक्स आहेत. जॉनला फक्त बाइकचाच शौक नाही. त्याच्या कलेक्शनमध्ये अनेक गाड्याही आहेत. यामध्ये निसान जीटीआर ब्लॅक एडिशन, ब्लॅक लॅम्बोर्गिनी गॅलार्डो ते ब्लॅक फेरारी यासारख्या कारचा समावेश आहे.

चित्रपटांव्यतिरिक्त जॉन जिम आणि रेस्टॉरंटमधून कमाई करतो. स्वतः फिट असलेला जॉन जिम चेन चालवतो. जॉनकडे जेए फिटनेस नावाने दोन जिम आहेत. एक जिम मुंबईत वरळी आणि दुसरी पुण्यात आहे. याशिवाय जॉनचे दिल्लीत फॅट अब्राहम बर्गर नावाचे रेस्टॉरंटही आहे. जॉनची एकूण संपत्ती २७० कोटी रुपये आहे. आतापर्यंत त्याने अभिनेता म्हणून ४५ तर निर्माता म्हणून ७ चित्रपट केले आहेत. त्याचा ‘हाऊसफुल ५’ हा  येत्या काळात प्रदर्शित होणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story