दिशाला व्हायचे होते शास्त्रज्ञ

'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी २' यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री दिशा पटानी मंगळवारी ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या निमित्ताने काही चाहत्यांनी दिशाशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 14 Jun 2023
  • 01:58 pm
दिशाला व्हायचे होते शास्त्रज्ञ

दिशाला व्हायचे होते शास्त्रज्ञ

'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' आणि 'बागी २' यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री दिशा पटानी मंगळवारी ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या निमित्ताने काही चाहत्यांनी दिशाशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला आहे. तुझा पुढचा चित्रपट कोणता, इंग्रजी चित्रपटात काम करणार आहेस का, असे काही प्रश्न चाहत्यांनी विचारले आहेत, तर काहींनी 'तू अजूनही १६ वर्षांचीच दिसतेस, ३१ ची अजिबात वाटत नाही, अशी मिश्किल दादही दिली आहे.' 

दिशा आज बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री असली, तरी अभिनेत्री होण्याचे तिने कधीच ठरवले नव्हते. तिला शास्त्रज्ञ व्हायचे होते. दिशाचा जन्म १३ जून १९९२ रोजी उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये झाला आहे. सलमान खान, टायगर श्रॉफसारख्या बड्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या दिशाने कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. दिशा आणि अभिनय क्षेत्राचा दूर दूरपर्यंत संबंधही नव्हता. 

दिशाने शास्त्रज्ञ होण्याचे तिच्या बालपणीच ठरवले होते. त्यादृष्टीने पाऊल उचलत तिने लखनौमधील एमिटी युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. महाविद्यालयात असताना तिने मॉडेलिंगमध्ये काम करायला सुरुवात केली आणि हाच तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.  वयाच्या १७ व्या वर्षी दिशाने पहिले फोटोशूट केले आणि ग्लॅमरस जगासोबत ती जोडली गेली. २०१५ साली तिने एका जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. दरम्यान, २०१५ मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'लोफर' या तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून तिला पहिला 'ब्रेक' मिळाला. तिचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 

'लोफर' चित्रपटानंतर दिशा पटानी रातोरात 'स्टार' झाली. त्यानंतर 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाच्या माध्यमातून २०१६ मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात ती सुशांतसिंह राजपूतसोबत झळकली होती. आपल्या पहिल्याच सिनेमाने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मीडिया रिपोर्टनुसार, फक्त ५०० रुपये घेऊन दिशाने मुंबई गाठली होती. आज ती कोट्यवधींच्या घरात आहे.

दिशा पटानी आज बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करणाऱ्या दिशाने 'बागी २', 'मलंग', 'भारत', 'राधे यू आर मोस्ट वाँटेड भाई' सारख्या गाजलेल्या सिनेमांत काम केले आहे. तिचा 'योद्धा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story