‘पत्रापत्री’च्या प्रयोगांची चर्चा

'माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं' या खेळाच्या आठवणी अनेकांच्या स्मृतिरंजनात असतील. मात्र काळाच्या ओघात हा खेळ हरवून गेला आणि ते पत्रसुद्धा. खरे  तर एक छोटा कागदाचा कपटा, पण पत्रामध्ये, दोन शब्दांमध्ये, दोन रेषांमध्ये कितीतरी अव्यक्त गोष्टी दडलेल्या असत. हल्ली पत्रप्रपंच कमी झाला असला तरी काही पत्रांच्या आठवणींचा दरवळ मात्र मनात चिरंतन दरवळतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 15 Jul 2024
  • 01:32 pm
Entertainment news,  memories of the game, I found my mother's lost letter, mararthi series

संग्रहित छायाचित्र

'माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं' या खेळाच्या आठवणी अनेकांच्या स्मृतिरंजनात असतील. मात्र काळाच्या ओघात हा खेळ हरवून गेला आणि ते पत्रसुद्धा. खरे  तर एक छोटा कागदाचा कपटा, पण पत्रामध्ये, दोन शब्दांमध्ये, दोन रेषांमध्ये कितीतरी अव्यक्त गोष्टी दडलेल्या असत. हल्ली पत्रप्रपंच कमी झाला असला तरी काही पत्रांच्या आठवणींचा दरवळ मात्र मनात चिरंतन दरवळतो. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना डॉ. श्रीराम लागू यांनी लिहिलेल्या पत्रांचा दरवळ आणि त्याची आठवण आजही दिलीप प्रभावळकर यांच्या मनात रुंजी घालतायेत. त्यामुळेच तर पत्रापत्री या नाटकाच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

‘हसवाफसवी’ हे नाटक पहिल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यासाठी पत्र लिहिले. या पत्राच्या आठवणी आजही चांगले काम करायला बळ देतात असे सांगताना, नाट्यरसिकांसाठी दिलीप प्रभावळकर यांनी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे, त्यासही नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे प्रभावळकर म्हणाले.  दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रापत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाचे प्रयोग सध्या जोरदार सुरू आहेत. यासाठी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांची त्यांना साथ लाभली आहे.

आज पत्रात्मक संवाद कालौघात मागे पडलेला असताना बदामराजा प्रोडक्शन्स निर्मित ‘पत्रापत्री’ हा रंगाविष्कार मंचावर येणं नाट्यरसिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळणे हे निश्चितच उत्सुकता वाढवणारे आहे. माधुरी गवांदे, निनाद कर्पे याचे निर्माते आहेत. दिलीप प्रभावळकर याविषयी म्हणाले, पत्रलेखनामधील ओलावा आणि आपलेपणाची अनुभूती रसिकांना देण्यासाठी ‘पत्रापत्री’ चा प्रयोग करण्याचे ठरवले.

‘प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीचे लेखन या पत्रांमध्ये आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. अशा पाच कथा आम्ही अभिवाचनासाठी निवडल्या आहेत.’ तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा बनून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचे अभिवाचन करत आहेत. या ‘दृक आविष्कारा’चे दिग्दर्शन विजय केंकरे यांचे असून रंगावृत्ती नीरज शिरवईकर यांची आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. या प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दिलीप प्रभावळकर हे एक प्रयोगशील अभिनेते आहेत. त्यांनी आजवर चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story