संग्रहित छायाचित्र
सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी आपल्या हाॅट अदांनी बॉलिवूडप्रेमींचा कलेजा खलास करणारी अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan)विरुद्ध २०१८ मध्ये फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने तिला जामीन मंजून केला आहे.
झरीन या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सोमवारी (दि. ११) कोलकाता न्यायालयात हजर होती. न्यायालयाने तिला अंतरिम जामीन मंजूर केला आणि परवानगीशिवाय देश सोडू नये, असे आदेश दिले. या प्रकरणी काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने झरीनच्या नावावर अटक वॉरंट जारी केले होते, त्यानंतर कोलकाता पोलिसांनी तिला समन्स बजावले होते. आता अखेर तिला या प्रकरणात थोडा दिलासा मिळाला आहे.
कोलकात्याच्या सियालदह न्यायालयाने झरीनला ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर २६ डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सोमवारी या सुनावणीत सहभागी होण्यासाठी झरीन मुंबईहून कोलकाता येथे पोहोचली. तिने कोर्टात काळी टोपी परिधान केली होती आणि आपला चेहरा मास्कने झाकलेला होता. खटल्याची सुनावणी तासभर चालली.
झरीनने २०१० मध्ये सलमान खानच्या 'वीर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नंतर तिचे चित्रपट फारसे चालले नाही. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘हेट स्टोरी ३’मधील हाॅट भूमिकेमुळे झरीन पुन्हा एकदा चर्चेत आली. सलमानच्या 'रेडी' चित्रपटात तिने केलेले आयटम साॅंग 'ढिला' चांगलेच गाजले. याशिवाय झरीनने 'हाऊसफुल २', 'अक्सर २' आणि '१९२१'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'हम भी अकेले तुम भी अकेले'मध्ये झरीन शेवटची दिसली होती.
काय आहे प्रकरण?
झरीन २०१८ मध्ये कोलकाता येथे दुर्गापूजेच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार होती. या कार्यक्रमासाठी तिने आयोजकांकडून १२ लाख रुपये आगाऊ घेतले होते. यानंतरही ना झरीन कार्यक्रमाला पोहोचली ना तिने याबाबत आयोजकांना कोणती माहिती दिली. आयोजक झरीनची वाट पाहत राहिले आणि नंतर त्यांनी तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.