अभिनेत्री रकुल प्रीत-जॅकी भगनानी अडकले विवाहबंधनात
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackie Bhagnani) लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या दोघांचे लग्न शीख रितीरिवाजानुसार गोव्यात पार पडले. अभिनेत्रीच्या लग्नाला चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान लग्नाची बातमी समोर येताच रकुलच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.
लग्नाला प्रसिद्ध स्टार्स उपस्थित
रकुल आणि जॅकी भगनानी यांनी दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर आज आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. गोव्यात जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत या जोडप्याने एकमेकांचा हात धरला. बॉलिवडूमधील शिल्पा शेट्टी, अर्जुन कपूर, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे आणि ईशा देओल यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
हिंदू रितीरिवाजानुसार करणार लग्न
शीख रितीरिवाजांनुसार लग्नानंतर हे जोडपे हिंदू रितीरिवाजानुसारही लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. दोघेही आज संध्याकाळी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. या जोडप्याचे लग्नाआधीचे कार्यक्रम १९ फेब्रुवारीपासून सुरू झाले. तत्पूर्वी, गोव्याला रवाना होण्यापूर्वी रकुल आणि जॅकीने बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले होते.
मुंबईत देणार रिसेप्शन
गोव्यातील लग्नानंतर रकुल आणि जॅकी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी देणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या, चाहते नववधू रकुल आणि वर राजा जॅकीचे फोटो पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. जॅकी भगनानी हा चित्रपट निर्माता आहे. रकुल एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रकुल लवकरच 'इंडियन 2' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचवेळी, जॅकीच्या प्रोडक्शनचा पुढचा चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.