संग्रहित छायाचित्र
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडवर ईडीने कारवाई का केली नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे.
वाल्मिक कराडला मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीने यापूर्वीच नोटीस दिली होती. मात्र कुठलीही कारवाई न झाल्याने कराड बिनधास्त आहे. ईडीने कारवाई केली असती तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलंच नसतं. अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली, तर मग वाल्मिक कराडवर कारवाई का झाली नाही? असाही सवाल सुळे यांनी केला.
मागील एक महिना बीड आणि परभणी घटनेबाबत राष्ट्रवादीचे लोक बोलत आहेत. संसदेत पहिला आवाज खासदार बजरंग सोनवणे यांनी उठवला. तर, या जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर हेही या घटनांबद्दल सातत्याने बोलत आहेत. त्यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता.
हा विषय मी आणि बजरंग सोनवणे 30 तारखेला संसदेच्या अधिवेशनात मांडणार असून याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनाही याबाबत विचारणा करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेच्या परळीचे तालुकाध्यक्ष वाल्मिक कराड आहेत. ही योजना लोकसभा निवडणुकीनंतर आली. वाल्मीक कराडवर लोकसभेच्या आधीच खंडणीचा गुन्हा दाखल होता. खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या माणसाला महिलांसाठीच्या लाडकी बहीण योजनेच्या कमिटीचा अध्यक्ष करता, हे असंवेदनशील आणि धक्कादायक आहे. अनिल देशमुख संजय राऊत नवाब मलिक याना एक कायदा आणि वाल्मिक कराडला वेगळा कायदा का? अशी टिका सुप्रिया सुळे यांनी केली