Buldhana Hair Loss : ...म्हणून लोकांना टक्कल पडत होते, खरं कारण आलं समोर (Video)
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सहा गावातील गावकऱ्यांच्या केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडत आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केसगळतीचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी गावातील पाण्याचे नमुने संकलित करुन अहवालासाठी पाठवण्यात आले होते. आज या या पाण्याचा अहवार प्राप्त झाला असून या अहवालातून कारण समोर आले आहे. येथील पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, बाधित गाव परिसरातील पट्टा हा खारपणपट्ट्यात येतो तेथे पाण्यातील नायत्रेटचं प्रमाण जास्त आहे. साधारणत: पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण 10 टक्के असायला पाहिजे मात्र या गावांमध्ये ते 54 टक्के आहे. त्यामुळे या भागातील पाणीच घातकच असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आरसेनिक व लीड तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाणी नमुने पाठवल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच सध्या अशा रुग्णांची संख्या घटत असून ज्यांचे केस गेले होते ते परत येत आहेत अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी दिली आहे.