संग्रहित छायाचित्र
महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी. गेल्या १० वर्षांत एकूण साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस मंत्री आहेत. ज्यांनी न्याय मागितला, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ज्या वामन म्हात्रेने अत्यंत घाणेरडी टिप्पणी केली, त्याला तुम्ही सोडून देता. वामन म्हात्रेला का अटक केली नाही? प्रश्न विचारणाऱ्या पालकांना अटक करता आणि वामन म्हात्रेला वेगळी वागणूक का, असा प्रश्न शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेंचा तो जवळचा आहे म्हणून, त्याला ही वागणूक दिली जाते का असा प्रश्न विचारून अंधारे म्हणाल्या, अक्षय शिंदे ऐवजी अकबर शेख वगैरे असता तर नितेश राणेंनी थयथयाट केला असता. तुम्ही जात-धर्म बघून व्यक्त होता का. तुमच्या लेखी लेकीबाळींची सुरक्षा काही आहे की नाही. पोलीस आयुक्त डुंबरे यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवं होते. महिला पत्रकार प्रश्न विचारते तेव्हा वामन म्हात्रे म्हणतो की, तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखं का बोलतेस. हा मस्तवालपणा कुठून येतो. आंदोलन तुम्ही चिघळवल. तुम्हाला जर कायदा सुव्यवस्था जपायचं असेल तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही?, असेही अंधारे म्हणाल्या.
याप्रकरणी उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमण्यात आलं आहे. याबाबत अंधारे म्हणाल्या, आम्हाला सरकारी वकील उज्ज्वल निकम मान्य नाही. उज्ज्वल निकम आता भाजपाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी भाजपा तिकिटावर निवडणूक लढवली. त्यांना सरकारी वकील कसं करता, आम्हाला मान्य नाही.