संग्रहित छायाचित्र
पुणे: कृषी विभागातील कृषी सेवक (Krishi Sevak) पदाची निवड यादी प्रसिद्ध करुनही कागदपत्रे पडताळणी अद्याप सुरू केलेली नाही. तलाठी, शिक्षक तसेच जिल्हा परिषद मधील विविध पदांची कागदपत्रे पडताळणी प्रकिया सुरू असताना कृषि सेवक कागदपत्रे पडताळणीलाच विलंब का ? असा प्रश्न निवड यादीतील उमेदवारांनी उपस्थित केला आहे. (Krishi Sevak document)
कृषी विभागाने जवळपास ४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आयबीपीस कंपनी सोबत करार करुन सप्टेंबर २०२३ मध्ये १५५५ (अनुसूचित क्षेत्रातील जागा वगळता) जागेसाठी कृषी सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानंतर १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली आणि दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १२ मार्च २०२४ रोजी निकाल घोषित केले. त्यानंतर कृषि विभागाने तत्परता दाखवत ३ दिवसानंतर म्हणजे १५ मार्च २०२४ रोजी तात्पुरती अंतरिम गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केल्या. परंतु संभाजीनगर कृषि विभागाचे कोठे घोडे अडले माहित नाही. अद्याप संभाजीनगर कृषी विभागाने तात्पुरती अंतरिम गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केलेली नाही. निवड याद्या प्रसिद्ध होऊनही कागदपत्रे पडताळणी अद्यापही रखडली आहे.
कागदपत्रे पडताळणी सुरू करावे यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी मागील काही दिवसांपुर्वी कृषी विभाग अमरावती तसेच इतर कृषि विभागाला ईमेल द्वारे निवेदन दिले असता, कृषी विभाग अमरावती यांनी लोकसभा निवडणूक आचारसंहिताचे कारण सांगितले आहे. परंतु महाराष्ट्रात इतर विभागामध्ये महसुल विभागातील तलाठी पदाचे, शिक्षण विभागातील शिक्षक भरतीचे कागदपत्रे पडताळणी आचारसंहितेमध्ये सुरू आहेत. त्यासोबतच जिल्हा परिषद भरती मधील विविध पदांची कागदपत्रे पडताळणी प्रकिया सुरू केलेल्या आहेत. इतर सरळसेवेने भरती प्रक्रिया सुरू असलेल्या पदांची कागदपत्रे पडताळणी सुरू आहे, मग कृषि विभागालाच कागदपत्रे पडताळणीचे वावडे का? अशी विचारणा निवड यादीमधील उमेदवार केली, असून संताप व्यक्त केला आहे.